दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी -बापू बोराटे
पुणे (इंदापूर):- जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग इंदापूर यांच्यामार्फत तालुक्यातील शेटफळ हवेली येथील गारपीर रस्ता ते सावंत वस्ती हा रस्ता डांबरीकरण करण्यात आला आहे. परंतु या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. याची आपल्या विभागामार्फत चौकशी करून कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यकारी उपअभियंता पंचायत समिती इंदापूर यांना तक्रारी निवेदन देऊन करण्यात आले आहे .
या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की,या रस्त्याचे काम ज्योतिराम मनोहर जामदार मुक्काम पोस्ट बेलवाडी या कॉन्ट्रॅक्टरने केले असून हे काम ३०/५/२०२५ रोजी पूर्ण झाले आहे असे या कॉन्ट्रॅक्टरने संबंधित ठिकाणी नामफलक लावून दर्शविले आहे. परंतु काम पूर्ण होऊन २० ते २२ दिवस होण्याअगोदरच या रोडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तडे व ठिकठिकाणी रस्त्याला खड्डे पडले असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. रोडच्या दोन्ही बाजूला साईट पट्टी चे काम करण्यात नाही.
या कामांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहे. या कामांमध्ये वापरलेले साहित्य तसेच कामाची पद्धत ठरवलेल्या अंदाजपत्रकानुसार नाही. यामुळे या रस्त्यांच्या टिकाऊपणाबाबत शंका निर्माण झाली आहे.नियमित निरीक्षणांअभावी आणि गुणवत्तेची तपासणी योग्य प्रकारे न झाल्यामुळे ही समस्या उद्भवली आहे. अशा परिस्थितीत,पावसाळ्यात या रस्त्यांचे खूप मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होईल व नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल.
चौकट:-१
भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आजतागायत आम्हाला मजबूत असा रस्ता नव्हता,पहिल्यांदाच आम्हाला डांबरी रस्ता मिळाला परंतु तोही इतक्या निकृष्ट दर्जाचा मिळाला आहे.असे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
कृपया याबाबत त्वरित कारवाई करून योग्य तपासणी केली जावी. ज्योतीराम मनोहर जामदार या दोषी ठेकेदारांवर व संबंधित अधिकारी यांच्यावर योग्य कारवाई करून, रस्त्यांच्या कामांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक ते बदल केले जावेत. तसेच, या प्रकल्पासाठी दिलेल्या अंदाजपत्रकाची योग्य तपासणी करून, ते त्यानुसार खर्च झाला आहे का याची खात्री केली जावी.
आपल्या विभागाकडून त्वरित कारवाई करण्यात यावी, अन्यथा समस्त ग्रामस्थांच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची नोंद आपण घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.
चौकट :-२
जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग इंदापूर उप अभियंता शिवाजी राऊत यांची या विषयासंदर्भात भेट घेतली असता सदर तक्रारीच्या अनुषंगाने मी समक्ष जाऊन रस्त्याची पाहणी करून योग्य ती संबंधित कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांवरती कारवाई करू असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितले.
