‘या’ गोष्टीची सर्वत्र चर्चा !
अमेरिकेने भारतावर ५० टक्के टेरिफ लावले. त्याची अंमलबजावणी एक-दोन दिवसात होणार आहे. या टेरिफचा नकारात्मक परिणाम भारतीय निर्यातीवर होणार आहे. त्यामुळे यावर राजकारण तापले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टेरीफ लागू केले आहे. त्यामुळे भारतातून होणारी निर्यात महागणार आहे. त्याचा मोठा फटका निर्यातदार संस्थांना बसण्याची शक्यता आहे. काळात भारतातील व्यापाऱ्यांनाही अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यावर मालेगाव शहरात प्रतिक्रीया उमटली आहे.
या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच या अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन केले होते. उत्तर म्हणून नागरिकांनी स्वदेशीच्या वस्तूंच्या वापरावर भर दिला पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांचे हे आवाहन राजकीय दृष्ट्या अनेकांच्या भुवया उंचवणाऱ्या ठरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशीचे आवाहन केले. त्याला मालेगाव येथील अतिउत्साहात विनोद कुचेरिया या व्यापाऱ्याने लगेच प्रतिसादही दिला. कुचोरिया याने आपल्या दुकानातील चिनी वस्तूंची होळी केली. यावेळी त्यांनी दुकानातील चीनी फर्नीचर दुकानाच्या दारात आणून पेटवून दिले.
शहरातील माध्यमांना निमंत्रित करून आणि भरपूर गाजावाजा करीत चिनीमालाची होळी झाली. यापुढे आपण कोणताही चिनी माल विकण्यात नाही असे त्यांनी सांगितले. स्वदेशीचा नारा दिल्यामुळे त्याला प्रतिसाद म्हणून आपण हे कृत्य करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अतिशय प्रभावी नेते आहेत. एक नागरिकाने त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. स्वदेशी वस्तूंचा वापर केल्यास स्थानिक नागरिकांनाही आणि व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. ही सुरुवात असून लवकरच अन्य व्यापारी ही त्याचे अनुकरण करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान मोदी यांनी सांगितले आणि लगेचच मालेगावच्या या व्यापाऱ्याने त्याचे अनुकरण केले. मात्र अतिउत्साहात केलेले हे अनुकरण प्रसिद्धीसाठी तर नव्हते ना अशी चर्चा शहरभर सुरू झाली आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींना निमंत्रित करून आणि त्यांचा सन्मान करीत हा कार्यक्रम झाला. यानिमित्ताने आपली चर्चा व्हावी हा विनोद कुचोरिया याचा हेतू लपून राहिला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला मालेगावचे व्यापाऱ्याने दिलेला हा प्रतिसाद चर्चेचा विषय ठरला आहे.
