
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पालम : तालुक्यातील खरब धानोरा या गावात मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडी होऊन त्यात रुपये ७० हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला असल्याचे समोर आले आहे. दरम्यान सुमारे सात वर्षीय मुलाच्या चतुराईमुळेच ही चोरी अगदी थोडी-थोडक्यात झाली, असं म्हटलं तर ते चुकीचे होणार नसून होणारा फार मोठा अनर्थ सुध्दा टळला गेला आहे अन्यथा आयुष्याची पूंजी पूर्णपणे लुटली जाऊन ते पूर्ण घरच धुतले गेले असते अशी धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. याप्रकरणी पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पालम तालुक्यापासून काही कि.मी.अंतरावर असलेल्या खरब धानोऱ्यात हा थरारक असा घरफोडीचा प्रकार नरहरी पांडुरंग खिचडे यांच्या घरी घडला आहे. जानेवारीच्या ३० तारखेला रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर पांडुरंग खिचडे हे नेहमीप्रमाणे शेतजमीनीवर असलेल्या आखाड्यावर जागरण करायला म्हणून शेतीमध्ये गेले होते. त्यांचा मुलगा आणि ७ वर्ष वयाचा नातू हे दोघे घरातील बेडरुम मध्ये झोपले होते तर सून घराच्या व्हरांड्यात झोपली होती, अशी माहिती समजली आहे.
मध्यरात्री नंतर अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास बेडरुम मधील कपाटाचा आवाज आल्याचे कानी पडल्यामुळे सून घरात बघायला गेली तेव्हा कोणी तरी अज्ञात इसम तेथून पळाल्याचे दिसले. बेडरुम मधील कपाटाकडे बघितले असता ते उघडे असल्याचे दिसून आले. तसे उघडे कपाट बघून पोटात धस्स झालेल्या महिलेने एकच गोंगाट करुन निश्चिंत झोपलेल्या आपल्या नवऱ्याला उठविले, तेव्हा कुठे ढाराढूर घोरत झोपलेला कुंभकर्णरुपी नरहरी कसाबसा एकदाचा जागा झाला. झोपलेल्या अवस्थेतील नरहरीनेच काय झाले म्हणत उलटे आपल्या बायकोलाच विचारले. अहो, घर धुवून नेलं अन् तुम्हाला कशाची एवढी झोप लागली असे म्हणून बायको जोरात गळा काढून रडायला लागली. या सगळ्या गोंधळामुळे शेजार-पाजारची सर्व माणसे गोळा झाली. नेमकं काय गेलं, याचा तरी अंदाज घ्या असं कोणी तरी म्हणालं, तेव्हा कुठे चाचपणी केली गेली. त्यानंतर कानातील झुमके, काड्या व अंगठ्या असा सुमारे ७० हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरीला गेल्याचे समजले.
याउपरही जी भयानक बाब समोर आली, ते ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असे म्हटले. तर नवल ते कसले ? ज्या बेडरुम मध्ये नरहरी आपल्या मुलाला सोबत घेऊन झोपला होता, ते कपाट नरहरीच्या अगदी ऊशालाच होते. चोर पावलांनी घरात आलेल्या त्या अज्ञात चोरट्यांनी कपाट खोलून आपले इक्षिप्त साध्य केले त्यावेळी सात वर्ष वयाचा तो चिमुरडा कपाटाचा आवाज ऐकून उठला खरा, नि बाबा एवढ्या रातच्याला कपाट कशाला उघडताय म्हणून विचारायला लागला, तेव्हा मात्र जे काही हाती लागतंय ते घेऊन त्या अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. मुलाच्या डोळ्यांवर झोप होती व चोरट्यांनी कपड्याने तोंड गुंडाळून घेतल्यामुळे नेमका तो माणूस कोण असावा, हे त्याला कळलेच नव्हते. त्याला वाटले आपले बाबांचं असतील. तथापि हा सर्व प्रकार गोंधळामुळे त्याची झोप उडली गेल्याने उठून बसलेल्या मुलाने सर्वांना सांगून जणू भयगंडातच टाकले. त्यावेळी त्या मुलाच्या आईने तर उर्वरित वास्तवरुपी किस्सा सांगून आणखी दुसरा एक आश्चर्याचा मोठा धक्का दिला. जे कपाट चोरांनी खोलून डल्ला मारला होता, त्याच्याच बाजूला दुसरे आणखी एक कपाट होते, त्यात ५० हजारांची रोकड आणि बरेचसे सोन्याचे दागिने ठेवलेले होते. ते मात्र तसेच सही सलामत राहिले असल्याचे त्या महिलेने सर्वांना सांगितले होते. तो चिमुकला जर कपाटाचा आवाज ऐकून झोपेतून उठला नसता आणि एवढ्या रातच्याला कपाट कशाला उघडताय, असं बोलला नसता तर त्या चोरट्यांनी दुसऱ्या कपाटातील दागिन्यावरही डल्ला मारुन घर साफ केले असते. सतर्कतेविषयीचे जे काम बापाचे होते, तेच काम लहान असलेल्या चिमुकल्यांने करुन सर्वांसमोर एक आगळा वेगळा आदर्श ठेवला आहे. तथापि हा सारा भयानक प्रकार उजागर झाला आणि आता आपला डाव फसला जाईल व हाती घावणारं पण निघून जाईल, या रागापोटी चोरट्यांनी सदर चिमुकल्याचेच काही बरे वाईट केले असते तर काय भाव पडले असते ? याचाही विचार करणे गरजेचे नाही का ? दैव बलवत्तर म्हणून तो चिमुकला वाचला गेला. हाती जे लागले तेच घेऊन ते चोरटे पसार झाले, हे कपाटातील त्या सोन्याहून किती तरी पटीने लाख मोलाचे ठरले गेले, असं म्हटलं तर मुळीच चुकीचं ठरणार नाही. एकूणच काय तर त्या चिमुकल्याच्या चतुराईमुळे फार मोठा अनर्थ टळला गेला एवढे मात्र खरे. घरावर आलेलं मोठं संकट टळलं आणि कपाटातील उर्वरित ऐवजही सही सलामत राहिला, हे त्या आई-बापाचं मोठं नशीबच म्हणायला हरकत नाही.धन्य ते माता-पिता अन् धन्य ते बाळ, ज्याच्यामुळे घर- परिवारावर आलेला पळाला काळ ! असंच म्हणता येईल एवढं नक्की.