दैनिक चालु वार्ता भोकर प्रतिनिधी -विजयकुमार चिंतावार :- आगामी काळात साजरे होणारे महाशिवरात्री,छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संत सेवालाल महाराज जयंती आदी सन – उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस स्टेशन भोकर येथे शांतता कमिटी ची बैठक घेण्यात आली होती त्या बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत असताना अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे यांनी आगामी येणारे सन – उत्सव साजरे करत असताना प्रत्येकाने सामाजीक बांधीलकी जपत तसेच पारंपारीक पद्धतीने मोठया उत्साहात साजरे करावे परंतु आपल्या शहरातील शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची पण तेवढीच काळजी घ्यावी असे मार्गदर्शन त्यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय पोलीस अधीक्षक शफाकत अमना, पोलीस निरीक्षक विकास पाटील,नायब तहसीलदार सोळंकर,पो.उप.नि. दिगंबर पाटील,राणी भोंडवे आदींची उपस्थिती होती.
बैठकीत उपस्थित असलेल्या जयंतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज आपल्याकडे पाहत आहेत याचा भाव जरी मनात ठेवला तरी खूप झाले आपोआपच आपले वर्तनही शुद्ध आणि पवित्र राहील.जयंती साजरी करत असताना गालबोट लागेल असे काहीही घडू देऊ नका, शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे काही पण करू नये तसे करत असताना दिसल्यास त्याची गय केली जाणार नाही,सोशल मिडिया द्वारे चुकीचे संदेश पसरवू नका,सोशल मिडिया चा चुकीचा वापर करू नका असे होत असल्यास पोलीस स्टेशन ला कळवावे,तसेच महापुरुषांच्या जयंत्या ह्या विधायक कार्यक्रम घेऊन साजऱ्या करा. यात प्रामुख्याने महापुरुषांच्या जीवनावर विद्वान व्याख्यात्यांची व्याख्याने, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान,आरोग्य शिबीर, अन्नदान असे विविध लोकोपयोगी कार्यक्रम घ्यावेत. शोभा यात्रेमध्ये पारंपारीक वाद्याचा उपयोग करुन आपल्या संस्कृतीचे रक्षण होईल याची खबरदारी घेत पारंपारीक पद्धतीने साजरे करावेत तसेच कर्णकर्कश आवाज निर्माण होईल असे कोणतेही वाद्य जयंती मध्ये वाजवू नका तसेच नशाबाजी करून मिरवणुकीत सहभागी होऊ नका, कोणाच्याही भावना दुखावतील असे बॅनर लावू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
प्रास्ताविकात पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांनी मिरवणुकीमध्ये कोणी दारू पिऊन धिंगाणा घालू नये, तसेच कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील असे वर्तन ही करू नये, अश्लील नृत्य करू नये व सर्वांनी शांतता अबाधित राहील याची काळजी घेऊन सर्वधर्मसमभाव जोपासावा व भोकर ची शांतता प्रिय असलेली ओळख कायम ठेवून शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखावी असे आवाहन केले.डीवायएसपी शफाकत अमना यांनी सर्व समाजप्रमुखांनी जबाबदारीने वागून शांतता प्रिय उत्सवाची तालुक्याची परंपरा कायम ठेवावी सर्व महापुरुषांच्या जयंत्या त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून साजऱ्या कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस प्रा.व्यंकट माने, शिवाजी पाटील किन्हाळकर,आदींनी आपले मनोगत व्यक्त करून जयंती दिनानिमित्त शहरातील विविध समस्यांवर प्रकाश टाकून त्या प्रशासनाकडून त्वरित सोडवण्यात याव्यात अशी मागणी केली. विशेष करून शहरात भेडसावत असणारा वाहतुकीचा प्रश्न बस स्थानक ते शिवाजी चौक,आंबेडकर चौक व किनवट रोड, रेल्वे उड्डाणुलाखालून ये जा केल्या जाणाऱ्या रस्त्या वर बसलेले भाजीपाला दुकाने अतिक्रमणे हटवण्यासंबंधी सर्वांनी आवाज उठवला.जयंतीच्या काळात वाहतुकीचा व अतिक्रमणाचा प्रश्न आम्ही प्रामुख्याने सोडवू असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
या बैठकीत महाशिवरात्री महोत्सव उत्सव समितीचे पदाधिकारी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती मंडळांचे पदाधिकारी तसेच सेवालाल महाराज जयंती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व शांतता कमिटीचे सदस्य,तालुक्यातील पोलिस पाटील व पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
