
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा :-
आरक्षण लढ्यातील प्रमुख योद्धे मनोज पाटील जरांगे यांच्या सभेची तयारी करण्यासाठी कंधार कडे जात असलेल्या चोंडी ता. लोहा येथील बालाजी जाधव यांचा मोटारसायकलच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात जाधव कुटुंबीयांना दि. १२ डिसेंबर रोजी लोहा व कंधार तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने ६ लाख ७५ हजार रुपये आर्थिक मदत दिली.
मराठा आरक्षण लढ्यातील प्रमुख मनोज पाटील यांची कंधार येथे दि. ८ डिसेंबर रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेच्या नियोजनाच्या तयारी साठी लोहा तालुक्यातील चोंडी येथील मराठा स्वयंसेवक बालाजी जाधव हे दुचाकीने कंधार येथील सभास्थळाकडे जात असताना घोडज नजिक मोटारसायकल अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सभा आटोपल्यानंतर जरांगे यांनी चोंडी येथे जाऊन जाधव कुटुंबीयांची संत्वन भेट घेवून त्यांना धीर देत लोहा व कंधार तालुक्यातील सकल मराठा समाजाला उद्देशून जाधव कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत दोन्ही तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी निधी संकलन करून मयत जाधव कुटुंबीयास ६ लाख ७५ हजार रुपयांचा निधी मदत म्हणून देण्यात आला.