
नीट परीक्षेचे पावित्र्य धोक्यात येणे चिंताजनक
एकाही गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची शासनाने हमी द्यावी
– आ. अमित विलासराव देशमुख
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातुर/उदगीर : नीट परीक्षेच्या निकालातील गोंधळामुळे संपूर्ण देशातील शैक्षणिक क्षेत्र हादरून गेले असून या परीक्षेतील पावित्र्य धोक्यात आल्याने विद्यार्थी वर्ग भविष्याच्या चिंतेने ग्रासला गेला आहे. शासनाने या परीक्षेतील गैरप्रकार तातडीने शोधून काढून अभ्यासू आणि कष्टाळू विद्यार्थ्यांना अश्वस्त करणे आवश्यक बनले असल्याचे माजी वैद्यकीय शिक्षण तथा सांस्कृतिक कार्य मंत्री आ.अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
माजी वैद्यकीय शिक्षण तथा संस्कृती कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या संदर्भाने प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नियोजित वेळेपूर्वी घाई गडबडीत ऐन लोकसभा निवडणुकीच्या निकाला दिवशीच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या निकालात तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे ७२० मार्क मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यात १५६३ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण दिल्याची माहिती पुढे आली आणि त्यानंतर एका पाठोपाठ या परीक्षेतील अनेक गैरप्रकार उघड होत आहेत. एकंदरीत या परीक्षेचे पावित्र्यही आता धोक्यात आल्याची भावना सर्वत्र निर्माण झाली आहे. परिणामी देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे आणि संतापाचे वातावरण तयार झाले आहे.
डॉक्टर बनून रुग्ण सेवा करण्याच्या उद्देशाने दरवर्षी प्रचंड मेहनत आणि कष्ट करून विद्यार्थी ही नीटची परीक्षा देतात. यावर्षी देशातील २३ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.या परीक्षेच्या निकालात गोंधळ झाल्याचे उघड झाल्यानंतर गुजरात,हरियाणा,बिहार यासह इतर अनेक राज्यात पेपर फुटीचे प्रकारही आता पुढे आले आहेत.त्यामुळे परीक्षा दिलेल्या आणि भविष्यात ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्यात तर या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, येथील वैद्यकीय सेवेचा लौकिक जगभरात पसरलेला आहे त्यामुळे,राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर होण्याकडे मोठा कल आहे, राज्यात आणि देशात शिक्षणाचा आदर्श पॅटर्न निर्माण करणाऱ्या लातूर मध्ये दरवर्षी हजारो विद्यार्थी खूप मोठी तयारी करून नीट ची परीक्षा देतात,त्यामुळे दरवर्षी राज्यात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवणारे सर्वाधिक विद्यार्थी लातूरचे असतात, अलीकडच्या काळात मराठवाड्यातील नांदेड, छत्रपती संभाजीनगर,धाराशिवसह राज्यात सर्वत्र या पॅटर्नचे अनुकरण होत आहे. अथक परिश्रम करून गुणत्तेच्या जोरावर या परीक्षेत यश मिळवण्याची खात्री बाळगून असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नीट परीक्षेतील गोंधळामुळे चिंतेचे वातावरण आहे,
सध्या नीट परीक्षेतील गोंधळाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे हे जरी खरे असले तरी महाराष्ट्र शासनानेही राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही याची हमी देणे आवश्यक आहे.
यूपीएससी,एमपीएससी पासून, विविध खात्यांच्या भरती प्रक्रियेत पेपर फुटी आणि गैरप्रकार झाल्याच्या घटना ताज्या आहेत,त्यात आता नीट परीक्षेचे पावित्र्यही संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे त्यामुळे एकंदरीत सर्व प्रकारच्या परीक्षा आणि नोकर भरतीची प्रक्रिया पारदर्शक बनवणे अनिवार्य बनले आहे. त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू करून त्यासंबंधीची माहिती प्रसारित करणे गरजेचे असल्याचेही आमदार अमित विलासराव देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
———————————-