
दै.चालु वार्ता,
उदगीर, प्रतिनिधी
*अविनाश देवकते*
*लातूर (उदगीर) :* उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील देगलूर ते मुक्रमाबाद रस्त्यावर अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असून कोंबून प्रवासी भरलेल्या वाहनाकडे पोलिसांचे दुर्लक्ष.
उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वच रस्त्यावर अवैध वाहतूक सर्रासपणे सुरू असून त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे .पोलीस प्रशासन आणि नियमबाह्य खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे सबंध इतके मधुर आहेत की जणूकाही वाहतूक पोलिसांकडुन खाजगी वाहतूकदारांना कोणताही धोका होऊ शकणार नाही असे चित्र दिसून येत आहे.
उदगीर ते देगलूर व ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाकडून होत असलेल्या वाहतूक सेवेत योग्य नियोजन नसल्याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतुकदारांना होत आहे. बसची अपुरी संख्या प्रवाशाच्या सोयीनुसार बसची सेवा नसणे आणि तीन – चार तास एकही बस नसणे तर दिवसभरातून केवळ एकदाच बस असणे असे प्रकार ग्रामीण भागात असल्याने प्रवासी वैतागून खाजगी वाहतुकीकडे वळतात बसस्थानक परिसरात खाजगी प्रवासी वाहतुकदारांचा गराडा असतो. दलाल बसस्थानकातून प्रवासी पळवतात प्रवाश्यांच्या दृष्टीने सोयीची वाटणारी खाजगी प्रवासी वाहतूक धोकादायकही आहे. तालुक्यात सर्वच ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतुकीने कळस गाठला असून प्रवासी कोंबून भरलेले असतात. एक एका रिक्षा, टॅक्सी मध्ये दहा पेक्षा अधिक तर टॅक्सी किंवा ऑटोरिक्षात पंधरा ते वीस जण बसलेले असतात. वाहनांची तपासणी होणार असल्याने चालकांना आधीच कळलेले असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नियमित पणे तपासणी मोहीम सुरू केल्यास उदगीर तालुक्यातील अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसू शकेल.
उदगीर ते मुक्रमाबाद ,देवणी ते उदगीर, उदगीर ते पिंपरी,घोणशी, मार्गे पाटोदा जळकोट, रावणकोळा ते नागलगाव, ते उदगीर या मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी असून प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी बसवून ही वाहतूक केली जाते अनेकदा प्रवासी थेट टॅक्सीला मागे लटकून किंवा टपावर बसवून वाहतूक होताना दिसते. यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. यदाकदाचित अपघात झाला तर सबंधिताकडून कार्यवाहीचे नाटक होते त्यानंतर जैसे थे चे चित्र पहावयास मिळते.
उदगीर तालुक्यातील ग्रामीण भागात होत असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालून सबंधित वाहन चालकांवर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.
_______हायलाईट👇______
छत्रपती शिवाजी चौक ते कॅ.कृष्णकांत चौक या मार्गावर वाहतुकीचा कायम घोळ
शहरात प्रवेशासाठी प्रत्येक नागरिकाला छत्रपती शिवाजी चौकातून ये- जा करावी लागते. दररोज येथे हजारो वाहनांची वर्दळ असते. मनाई असतानाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांचीही दिवसा ये-जा सुरू आहे. याकडे शहर वाहतूक पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. रस्त्यावर फळे विक्री करणाऱ्या हातगाड्या उभ्या राहतात. रिक्षाचालक बिनधास्तपणे कोठेही रस्त्यावर थांबतात. त्यामुळे वाहनचालकांना व नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीतूनच मार्ग काढत जावे लागते.वाहतूक शाखेचे कर्मचारी छत्रपती शिवाजी चौक येथे वाहनांवर कारवाई करीत असतात. मात्र वाहतूक कोंडी सोडविण्यात त्यांचे दुर्लक्ष आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारकांतूनही होत आहे.
___________________________________छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कॅप्टन कृष्णकांत चौक येथे दररोज मोठी वाहतूक कोंडी होत असते. अवैध प्रवासी वाहतूक करणारे छोटा हत्ती, काळी पिवळी,रिक्षाचालक याठिकाणी वाहनांना अडथळा ठरेल अशा पध्दतीनेच उभे करीत असल्याने याचा त्रास इतर वाहनधारकांना सहन करवा लागतो. अशा “बेशिस्त वाहनावर कारवाई करावी.”
-दयासागर जाधव, वाहनधारक