
दैनिक चालु वार्ता डहाणू प्रतिनिधी -सुधीर घाटाळ
अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा धुंदलवाडी येथे संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार आनंदभाई ठाकूर, सचिव पांडुरंग बेलकर, रोटरी क्लब जुहू बीचच्या अध्यक्षा मानसी ठाकूर आणि अशलँड ग्रुपचे सदस्य यांच्या उपस्थितीत नवीन इमारतीतील सहा वर्गखोल्यांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
2014 पासून रोटरी क्लब, स्थानिक संस्था आणि अशलँड कंपनीच्या सी.एस.आर फंडाच्या माध्यमातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले गेले. प्रथम टप्प्यात सौरऊर्जा प्रकल्प, शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर, खेळाचे मैदान (प्ले स्केप एरिया) आणि स्वयंपाकघरासाठी स्टीम सिस्टीमची उभारणी करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 200 विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह तसेच मुलींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक उल्हास सातवी यांच्या प्रास्ताविकाने झाली. विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. रोटरी क्लबच्या अध्यक्षा मानसी ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सुविधांचे जतन करण्याचे महत्त्व पटवून दिले. अशलँड ग्रुपचे भूपेश महाले आणि हरीश चंडक यांनी शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मार्गदर्शनपर विचार मांडले.संस्थेचे अध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांनी रोटरी क्लब आणि अशलँड ग्रुपच्या सहकार्याबद्दल आभार मानून, भविष्यातही शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रित नगराळे यांनी तर आभार प्रदर्शन कांता डावरे यांनी केले.