
दैनिक चालु वार्ता उदगीर प्रतिनिधी -अविनाश देवकते
लातूर (उदगीर) :रामभक्तांच्या श्रद्धेला साद घालत, उदगीर शहरात रामनवमीच्या पावन पर्वानिमित्त एक भक्तिमय व प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. शरद कुमार तेलगाने यांच्या ओम हॉस्पिटलच्या वतीने राम मंदिर, जळकोट रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात संगीत भजन, महाआरती आणि सर्व भाविकांसाठी प्रसाद वाटप यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात उदगीर येथील ख्यातनाम संगीत तज्ञ गोपाळराव जोशी आणि त्यांच्या भजन संचाच्या मनोहारी सादरीकरणाने झाली. त्यांच्या सुमधुर भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. उपस्थित भाविकांनी मंत्रमुग्ध होऊन भजनाचा आस्वाद घेतला.
या प्रसंगी ह. भ. प. उद्धव महाराज हैबतपुरे यांचे साधर्म्यपूर्ण मार्गदर्शन झाले. तसेच प्रवचनकार जगताप गुरुजी यांनी रामकथेसह जीवनातील सदाचार व भक्तीचे महत्त्व विषद केले. कार्यक्रमात मोहनराव खिंडीवाले, गोविंदराव जगताप, परमेश्वर मोरे, सुरज बिरादार, सुनील गुणाजी, प्रवीण बिरादार, तसेच मंदिराचे पुजारी ऋषिकेश महाराज यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
महाआरतीच्या वेळी संपूर्ण मंदिर परिसर “जय श्रीराम” च्या जयघोषाने दुमदुमून गेला. यानंतर सर्व भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. ओम हॉस्पिटलतर्फे भाविकांसाठी पिण्याचे पाणी, बैठक व्यवस्था, आरोग्यदायी वातावरण आणि स्वच्छता यांसारख्या सर्व सुविधा पुरवण्यात आल्या होत्या.
डॉ. शरद कुमार तेलगाने हे केवळ एक यशस्वी डॉक्टर नसून एक संवेदनशील कीर्तनकार देखील आहेत. समाजात आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जोपासना व्हावी यासाठी ते सातत्याने असे कार्यक्रम आयोजित करत असतात. यंदाच्या रामनवमी निमित्ताने त्यांनी अत्यंत सुंदर व सुबक आयोजन केल्याबद्दल परिसरातील नागरिक व भाविकांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.
—————————————-
या कार्यक्रमामुळे श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश पसरला असून, अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून अध्यात्म आणि आरोग्य यांचा सुंदर संगम घडवण्याचा प्रयत्न ओम हॉस्पिटलने केला आहे.