
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
( पुणे ) वाघोली : पुणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून उन्हाळा वाढला असून, नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सकाळी ११ वाजल्यापासूनच तापमानाचा पारा वाढत आहे. त्यामुळे कामानिमित्त फिल्ड वर्कवर जाणाऱ्या काही नागरिकांना डिहायड्रेशनचा त्रास होत आहे.डॉक्टरांकडे उपचारासाठी येणाऱ्या अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
हवामान खात्याच्या नोंदीनुसार आणखी काही दिवस तापमानाचा पारा चढा राहणार असल्याने नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत.उन्हामुळे घाम आणि त्यात प्रदूषणामुळे नागरिकांची चिडचिड वाढली आहे. वाढत्या तापमानात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी प्यावे. तसेच दुपारी उष्णता अधिक असल्याने या काळात बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.
आरोग्यावर होणारे परिणाम?
डिहायड्रेशन, चक्कर येणे, हात-पाय दुखणे, पोटात मळमळणे, मूत्रविकाराच्या समस्या, उलट्या, जुलाब
काय केले पाहिजे?
दररोज २-३ लिटर पाणी प्यावे.
नारळ पाणी, ताक, दही, लस्सी, फळाचा ज्यूस प्यावा.
चक्कर आल्यास ‘ओआरएस’चे पाणी प्यावे.
वातावरण बदलामुळे व्हायरल संसर्गाच्या रुग्णांमध्ये वाढ होते. अनेकवेळा सुका खोकल्याच्या तक्रारी वाढतात. उष्णतेमुळे सारखी तहान लागते. त्यामुळे नागरिकांचा थंड पेय आणि पाणी पिण्याकडे कल अधिक असतो. या वातावरणात अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होत असतो. काही रुग्णसुद्धा या तक्रारी घेऊन रुग्णालयात येत आहेत. अशावेळी नागरिकांनी मुबलक पाणी प्यावे. गरज नसताना उन्हात फिरू नये.
– डॉ. किरण औटी, वाघोली पुणे.