
तीन मोठे नगरसेवक भाजपच्या गळाला; आजच होणार पक्षप्रवेश…
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच उलथापालथ सुरु आहे. सध्या सर्वच पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांना आपापल्या पक्षात ओढण्यात व्यस्त आहे. त्यातच आता भाजपने एक नवी खेळी केली आहे.
भाजपने ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना जोरदार धक्का दिला आहे. मालवण नगरपालिकेतील ठाकरे गटाचे तीन मोठे नगरसेवक आज भाजपमध्ये सहभागी होणार आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने ठाकरे गटाला कोकणात जबरदस्त धक्का दिला आहे. मालवणमधील ठाकरे गटाचे काही महत्त्वाचे नेते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यात माजी बांधकाम सभापती यतिन खोत, माजी नगराध्यक्ष मंदार केणी आणि माजी आरोग्य सभापती दर्शना कासवकर या प्रमुख नावांचा समावेश आहे. मुंबईतील भाजपच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. यामुळे ठाकरे गटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात चांगलाच धक्का बसला आहे.
रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा
या नगरसेवकांबरोबरच प्रसिद्ध समाजसेविका आणि स्वराज्य फाउंडेशनच्या अध्यक्षा शिल्पा खोत, महिला उपशहर प्रमुख नंदा सारंग, संजय कासवकर आणि नितीन पवार यांच्यासह काही जुने नगरसेवकही भाजपमध्ये प्रवेश करतील. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोकणातील मोठे नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा पक्षप्रवेश होईल.
सिंधुदुर्गातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता
भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून रवींद्र चव्हाण हे कोकणातील राजकारणावर जास्त लक्ष देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील कोकणातील अनेक महत्त्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. या महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्त्यांना भाजपमध्ये आणून स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने ही योजना आखली आहे. सध्या ही योजना यशस्वी होताना दिसत आहे. मालवणमधील या मोठ्या पक्षबदलामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या पक्षप्रवेशाचा ठाकरे गटात काही परिणाम होतो का, हे पाणे महत्त्वाचे ठरणार आहे.