
धनंजय मुंडेंची सुनील तटकरेंकडे मागणी; भर मंचावर काय घडलं ?
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्याकडे काही महत्वाची जबाबदारी द्या, अशी मागणी केली आहे.
रायगडमधील एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली.
सुनील तटकरेंनी आम्हाला कायम मार्गदर्शन करत राहावं. चुकले तर कान धरावा…नाही चुकलं तर चालतं का?…पण आता रिकामं ठेवू नका…काहीतरी जबाबदारी द्या…अशी मागणी धनंजय मुंडे यांनी भर मंचावरुन केली. धनंजय मुंडेंच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे. यावर सुनील तटकरेंनी दिली प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडेंनी काहीतरी काम द्या, अशी मागणी केलीय. वरिष्ठ याबाबत योग्य निर्णय घेतील, असं सुनील तटकरे म्हणाले.
सुनील तटकरे कोकणाचा विकासपुरुष- धनंजय मुंडे
मला वडिलांचा आधार सुनील तटकरे यांनी दिला. सुनिल तटकरे यांनी अनेक दिग्गज नेत्यांपासून घनिष्ठ सबंध ठेवले. महाराष्ट्राच्या मातीत काय चालले आहे? त्यामधील जाणणारे सुनील तटकरे आहेत. कोकणाचा विकासपुरुष म्हणून सुनील तटकरे यांच्याकडे पाहिले जाते. सुनील तटकरे यांना कागद लागत नाही. मात्र महाराष्ट्रात काय सुरू आहे हे जाणणारे ते आहेत. त्यांचे वय आमच्यापेक्षा अजून तरुण आहे. मी सुनील तटकरे यांच्यामुळे उभा आहे, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
पक्षाला उंचीवर नेण्याचे काम सुनील तटकरेंनी केले- धनंजय मुंडे
कोकणचे विकास पुरुष म्हणून दमदार कामगिरी करणाऱ्या सुनील तटकरेंनी पक्ष नेतृत्वात देखील आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा निर्माण करत प्रेरणादायी वाटचाल आजवर केली आहे. माझ्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत देखील तटकरे साहेबांची वडिलकीची साथ व भक्कम पाठबळ मला लाभले आहे. देशाच्या संसदेत काम करताना देश हिताला ज्या प्रमाणे सर्वोच्च प्राधान्य देऊन सुनील तटकरेंनी आजवर काम केले, त्याच हिरीरीने आणि विश्वासाने पक्षात देखील नवतरुण चेहऱ्यांना संधी देत पक्षाला देखील एका उंचीवर नेण्याचे काम सुनील तटकरेंनी केल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितले.
धनंजय मुंडे हा चळवळीतील माणूस- चंद्रकांत पाटील
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यात असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी काल सुनील तटकरे यांच्याकडे मला काहीतरी काम द्या या वक्तव्यावर भाष्य केले. धनंजय मुंडे हा चळवळीतला माणूस आहे त्यामुळे तो स्वस्त बसू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी कामासाठी मागणी केली असावी, असं वक्तव्य करत चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडेंची बाजू घेतली.