
जगात खळबळ; दोन देशांना एकत्र घेऊन..
अमेरिका गेल्या काही दिवसांपासून इराणवर दबाव वाढवण्याचे काम करत आहे. शेवटी आता इराणच्या मदतीला रशिया धावून आलाय. इराणमध्ये लहान अणुऊर्जा प्रकल्प बांधण्यासाठी रशिया आणि इराणने बुधवारी मॉस्कोमध्ये एक महत्त्वाचा करार केला, ज्यानंतर अमेरिकेला धक्का बसला.
रशियन अणुऊर्जा एजन्सी रोसाटॉमचे प्रमुख अलेक्सी लिखाचेव्ह आणि इराणचे अणुऊर्जा प्रमुख आणि उपराष्ट्रपती मोहम्मद इस्लामी यांच्यात हा करार झाला. इस्लामी म्हणाले की, तेहरानने 2040 पर्यंत 20 गिगावॅट अणुऊर्जा निर्मितीची योजना आखली आहे, ज्यामध्ये आठ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधले जातील.
इराणमध्ये सध्याच्या घडीला बुशेहर शहरात फक्त एकच कार्यरत अणुऊर्जा प्रकल्प आहे. तो रशियाने बांधला होता आणि त्याची क्षमता अंदाजे 1 गिगावॅट आहे. मागील काही दिवसात रशिया आणि इराण यांच्यातील संंबंध अधिक चांगले झाल्याचे बघायला मिळतंय. अमेरिका आणि इस्रायलने इराणी अणुस्थळांवर केलेल्या हल्ल्यांचा रशियाने उघडपणे निषेध केला आहे. फक्त विरोधच नाही तर आता इराणच्या मदतीला रशियाला धावून गेलाय.
इस्रायलसोबतच्या युद्धात वाईट परिणाम झालेला इराण आता आपले क्षेपणास्त्र तळ पुन्हा बांधण्यात व्यस्त आहे. यादरम्यान मोठे नुकसान इराणच्या क्षेपणांशास्त्रांचे झाले. तेहरानने पारचिन आणि शाहरूद तळांवर दुरुस्ती सुरू केली आहे, जिथे क्षेपणास्त्र इंधन तयार करण्यासाठी आवश्यक असलेले मिक्सिंग प्लांट नष्ट करण्यात आले. फक्त रशियाच नाही तर चीन देखील इराणची मदत करू शकतो.
इराण आता चीनकडून आवश्यक उपकरणे आणि रसायने मागत असल्याचे काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी पूर्वी इराणला क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आणि साहित्य पुरवल्याचा आरोप चीनवर केला होता. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास यांनी कबूल केले की, अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे त्यांचे उच्च दर्जाचे युरेनियम साठे ढिगाऱ्याखाली दबली गेली आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा निगरानी संस्थेने इराणच्या समृद्ध युरेनियम साठ्याला गंभीर चिंतेचा विषय म्हणून वर्णन केले होते. अमेरिकेच्या नाकावर टिच्चून आता रशिया इराणला मदत करताना दिसत आहे.