प्रकाश आंबेडकर नेमकं काय म्हणाले ?
वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षण, 2 सप्टेंबर आणि मराठा समाजातील तरुणांच्या लग्नावर मत व्यक्त केले. 2 सप्टेंबर रोजीच्या जीआरविरोधात आता प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा शड्डू ठोकले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यात वंचितने भूमिका जाहीर केली आहे. ओबीसी महासंघ, मंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सप्टेंबर महिन्यातील शासन निर्णयाला विरोध केला आहे. काय म्हणाले आंबेडकर?
2 सप्टेंबरच्या जीआरला विरोध
ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघाने 2 सप्टेंबर रोजीच्या जीआरला विरोध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यात प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समावेश न करण्याची भूमिका आंबेडकरांनी मांडली. यापूर्वी दोनदा सरकारने असा प्रयत्न केला. त्याला यश आले नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे हैदराबाद आणि सातारा गॅझेट आणि त्याच्या अंमलबजावणीविरोधात विरोध तीव्र होत असल्याचे समोर येते.
निजामी मराठ्यांपासून फारकत घ्या
यावेळी त्यांनी सरसकट मराठ्यांच्या आरक्षणाविरोधातील भूमिका स्पष्ट केली. मराठ्यातील सरंजामशाहीला त्यांनी विरोध केला. मराठा समाजात एक निजामी मराठा वर्ग असल्याचे आणि दुसरा रयतेचा मराठा असल्याचे ते म्हणाले. रयतेतील मराठे हे शिवाजी महाराजांसोबत होते. तर सरंजाम मराठे निजामासोबत होते. सोळाव्या शतकातील या दोघांमधील भांडण आत या शतका सुद्धा स्पष्ट दिसत असल्याचे आंबेडकर म्हणाले.
निजामी मराठे आजही सत्तेत आहेत आणि त्यांना रयतेतील मराठ्यांना आरक्षण द्यायचे नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यांचा खरा अडसर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. निजामी मराठ्यांकडून फारकत घेतल्याशिवाय या मराठ्यांना आरक्षण मिळणार तर नाहीच पण न्यायही मिळणार नाही, त्यांचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण दूर होणार नाही असा दावा आंबेडकरांनी केला.
आज तिशी ओलांडूनही लग्न नाही
पूर्वी मराठा समाजातील मुला-मुलींची लग्न ही 20,22 आणि 25 व्या वर्षी लग्न होत होती. आज वयाची 30 वर्षे उलटून ही त्यांची लग्न होत नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांनी या निमित्ताने समाजातील सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. आरक्षणाची मागणी कशामुळे होत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या लढ्यामध्ये ओबीसींच्या बरोबर आहे. आम्हाला ओबीसी न्याय द्यायचा आणि रयतेतील मराठ्यांनाही न्याय द्यायचाय, फसवा फसवी चा खेळ आम्हाला करायचा नाही असे आंबेडकर म्हणाले.
जरांगे हे निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी
मनोज जरांगे यांचे आंदोलन चुकीचे असल्याचे आंबेडकर म्हणाले. त्यांना निजामी मराठ्यांकडून सर्व रसद पुरवण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते निजामी मराठ्यांचे प्रतिनिधी असल्याचा दावाही आंबेडकरांनी केला. त्याचवेळी ओबीसीकडे एकही नेता असा नाही की जो ओबीसी लढू शकतो असे मोठे वक्तव्य त्यांनी केले. निजामी मराठा याच्याकडे लीडरशिप आहे, परंतु रयतेतील मराठा जो आहे त्यांच्याकडे लीडरशिप नाही असे मत त्यांनी मांडले.


