2 आमदारांसह 27 बड्या नेत्यांचा पत्ता कट; पक्षात मोठी खळबळ…
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेजस्वी यादव यांनी राष्ट्रीय जनता दल पक्षात मोठी कारवाई करत एकाचवेळी 27 नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. या कारवाईमुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे.
पक्षविरोधात काम केल्याच्या आरोपावरून विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी दोन विद्यमान आमदारांसह तब्बल 27 पदाधिकारी, माजी आमदार आणि कार्यकर्त्यांवर कडक कारवाई केली आहे. या सर्वांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले.
राष्ट्रीय जनता दल प्रदेशाध्यक्ष मंगणी लाल मंडल यांनी या संदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी केले असून, या सर्व नेत्यांनी अधिकृत उमेदवारांच्या विरोधात उमेदवारी दाखल केली किंवा बंडखोर वर्तन करत पक्षविरोधी कारवाया केल्या. जिल्हानिहाय आलेल्या तक्रारींच्या आधारे या सर्वांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
हकालपट्टी झालेल्या माजी आमदारांमध्ये राम प्रकाश महतो, अनिल सहानी, सरोज यादव, गणेश भारती आणि अनिल यादव यांची नावे आहेत. तसेच राज्य महिला सेलच्या प्रमुख रितू जयस्वाल यांनाही पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. जयस्वाल या परिहार मतदारसंघातून राजदच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
राजदच्या या निर्णयामुळे बिहारमधील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. सध्या एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात थेट सामना रंगला असून, तेजस्वी यादव यांना इंडिया आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे केले आहे. निवडणूक प्रचाराला जोर धरत असताना पक्षांतर्गत शिस्त राखण्यासाठी घेतलेली ही कारवाई राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे.
ज्यांच्यावर कारवाई झाली आहे त्यामध्ये परसाचे आमदार छोटे लाल राय, गोविंदपूरचे आमदार कामरान, कटिहारचे माजी आमदार रामप्रकाश महतो, मुजफ्फरपूरचे माजी आमदार अनिल सहनी, बडहराचे माजी आमदार सरोज यादव, माजी विधान पार्षद गणेश भारती आणि नरपतगंजचे माजी आमदार अनिल यादव यांचा समावेश आहे.
तसेच अनेक जिल्ह्यातील पदाधिकारी, महिला व शेतकरी सेलच्या माजी अध्यक्ष, महासचिव आणि प्रवक्ते यांनाही पक्षातून बाहेर करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पक्षातील बंडखोरांना स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की पक्षविरोधी कारवाया कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत. बिहारमधील राजकीय वर्तुळात या घडामोडीमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, तेजस्वी यादव यांनी सोमवारी संध्याकाळी फेसबुक लाईव्हद्वारे नागरिकांना आवाहन केले की, छठपूजेसाठी राज्यात परतलेल्या स्थलांतरितांनी मतदानाचा अधिकार बजावल्यानंतरच आपल्या कार्यस्थळी परत जावे. त्याचबरोबर, त्यांनी रेल्वेतील गर्दी आणि प्रवासातील अडचणींवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला.


