भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांचा हल्लाबोल…
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी देशातील ताज्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना काँग्रेससह प्रादेशिक पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आहे. तामिळनाडूतील सुपरस्टार विजयची राजकीय एन्ट्री असो वा विरोधी पक्षनेते राहुल गांधींची कार्यशैली, नबीन यांनी स्पष्ट शब्दांत भाजपची भूमिका मांडली आहे.
राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा
विरोधी पक्षनेते पदाच्या प्रतिष्ठेचा उल्लेख करत नबीन म्हणाले की, “हे पद अटलबिहारी वाजपेयी आणि काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी भूषवले आहे. मात्र, सध्याचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भाषा आणि वागणूक अत्यंत अपरिपक्व आहे.” तसेच काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे हे दबावाखाली बोलत असल्याची टीकाही त्यांनी केली.
तामिळनाडूमध्ये एनडीएचं सरकार, केरळमध्ये जोरदार एन्ट्री
दाक्षिणात्य राजकारणाबद्दल बोलताना नबीन यांनी स्पष्ट केले की, तामिळनाडूमध्ये अभिनेता विजय याच्या राजकारणातील प्रवेशामुळे फारसा फरक पडणार नाही. “निवडणुकीनंतर विजयसोबत युती करण्याची कोणतीही शक्यता मला दिसत नाही. तामिळनाडूमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए (NDA) स्वतःचे सरकार स्थापन करेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच केरळमध्ये एलडीएफ आणि यूडीएफ यांच्यातील ‘मॅच फिक्सिंग’ यावेळेस जनता संपवेल, असेही ते म्हणाले.
बिहारमध्ये विरोधकांनी स्वत: ची काळजी करावी
बिहारच्या राजकारणात जेडीयूच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांना त्यांनी आरसा दाखवला. ज्यांच्याकडे ८० पेक्षा जास्त आमदार आहेत त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी विरोधकांनी स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करावा, असा टोला त्यांनी लगावला. मतदारसंघांच्या फेररचनेवरून राजकारण करणाऱ्यांना “तुम्ही स्वतः बनवलेल्या कायद्यावर तुमचा विश्वास नाही का?” असा उलट सवाल केला.
