
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त फरिदाबाद येथील ईएसआयसी रुग्णालयात आज महिला वीटभट्टी कामगार आणि अन्य औद्योगिक कामगारांसाठी आरोग्य आणि पोषण तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंदर यादव यांनी या शिबीराला भेट दिली.
या आरोग्य तपासणी कार्यक्रमादरम्यान केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्र्यांनी महिला वीटभट्टी कामगार आणि अन्य औद्योगिक कामगारांची भेट घेऊन त्यांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी महिला कर्मचाऱ्यांना रक्तक्षय आजाराबाबत जागरुक करून नियमित आरोग्य तपासणी करण्यावर आणि पौष्टिक आहार घेण्यावर भर दिला.महिला कामगारांचे उत्तम आरोग्य सुनिश्चित केल्याशिवाय “स्वस्थ भारत समृद्ध भारत” चे स्वप्न साकार होऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्र्यांनी कामगारांसाठी त्यांच्या मंत्रालयामार्फत चालवल्या जाणाऱ्या “प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना”, “पेन्शन दान योजना” आणि “ई-श्रम योजना” यांसारख्या योजनांबद्दल माहिती दिली. या भेटीदरम्यान कामगार आणि रोजगार मंत्र्यांनी रुग्णालयात दाखल रुग्णांचीही भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
यावेळी कामगार आणि रोजगार मंत्रालयांच्या सचिवांनी यांनी सध्या सुरू असलेल्या पथदर्शी प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत वीटभट्ट्या आणि विडी उद्योग आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्य आणि पोषण तपासणीसाठी 08.03.2022 रोजी पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, या प्रकल्पाअंतर्गत वीटभट्टी आणि विडी उद्योग आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या महिलांच्या आरोग्य आणि पोषणाची नियमित तपासणी सुरू करण्यात आली आहे.
या पथदर्शी प्रकल्पाचा 06 महिन्यांच्या कालावधीसाठी मासिक आढावा घेतला जाईल. त्यानंतर पुढील अंमलबजावणीसाठी या पथदर्शी प्रकल्पाच्या निष्कर्षांचे मूल्यमापन केले जाईल. या पथदर्शी प्रकल्पा अंतर्गत, या उद्योगांतील महिला कामगारांना जवळच्या ईएसआयसी रुग्णालय किंवा दवाखान्याशी संलग्न करण्यात आले आहे.