
दैनिक चालू वार्ता प्रतीनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली :- केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, 6 मे 2022 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीच्या (एनएसएसी) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण तसेच वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान, नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे मंत्री भूपेंदर यादव, पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, बंदरे, नौवहन आणि जलमार्ग राज्यमंत्री शांतनू ठाकूर उपस्थित राहणार आहेत.
ही समिती सागरमाला कार्यक्रमाचा आढावा घेण्यासह अन्य विषयांव्यतिरिक्त बंदर संलग्न रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी प्रकल्प, तरंगत्या जेटी आणि देशांतर्गत जलमार्गांच्या विकासाचा आढावा घेईल. ‘सागरतट समृद्धी योजना’ या नवीन उपक्रमाद्वारे किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या दोन बैठकांमध्ये, राष्ट्रीय सागरमाला शिखर समितीने सागरमाला उपक्रमासाठी आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि सागरमाला उपक्रमावर भर देण्यात आला आहे. आधीच्या बैठकींदरम्यान घेतलेल्या विविध निर्णयांवरील प्रगतीचे विश्लेषण या आगामी बैठकीत करण्यात येईल.
पंतप्रधान ‘पीएम गतीशक्ती’ उपक्रमाद्वारे प्रकल्पांची अंमलबजावणी वेळेवर पूर्ण करणे आणि सागरी विकासासाठी नवीन प्रकल्प समाविष्ट करणे सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, त्यावेळी होत असलेली ही शिखर समितीची बैठक सागरमाला प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दृष्टाने महत्त्वपूर्ण आहे.