
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी : केंद्रे प्रकाश
नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नॉर्वेचे पंतप्रधान महामहीम जोनास गेर स्टोर यांची कोपनहेगन येथे दुसऱ्या भारत- नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली. स्टोर यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये नॉर्वेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दोन्ही पंतप्रधानांची ही पहिलीच भेट होती. द्विपक्षीय संबंधासंदर्भात सध्या सुरू असलेल्या घडामोडींचा दोन्ही पंतप्रधानांनी आढावा घेतला आणि भविष्यातील सहकार्याच्या क्षेत्रांबाबत चर्चा केली. नॉर्वेची कौशल्ये आणि भारतातील वाव यामुळे दोन्ही देश परस्परपूरक असल्याची बाब पंतप्रधानानी अधोरेखित केली. नील अर्थव्यवस्था, अपारंपरिक उर्जा, ग्रीन हायड्रोजन, सौर आणि पवन उर्जा प्रकल्प, हरित नौवहन, मत्स्यव्यवसाय, जल व्यवस्थापन, पर्जन्य जलसंधारण, अंतराळ सहकार्य, दीर्घकालीन पायाभूत सुविधा गुंतवणूक, आरोग्य आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांचे संबंध बळकट करण्यास असलेला वाव दोन्ही नेत्यांनी विचारात घेतला. प्रादेशिक आणि जागतिक विकासासंदर्भातही त्यांनी चर्चा केली. प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींबाबतही यावेळी चर्चा झाली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे सदस्य म्हणून भारत आणि नॉर्वे संयुक्त राष्ट्रांमध्ये परस्पर हिताच्या जागतिक मुद्यांवर नेहमीच परस्परांच्या संपर्कात असतात.