
दैनिक चालु वार्ता दौंड प्रतिनिधी- अरुण भोई
दौंड:दोन वर्षांपासून प्रलंबित प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया त्वरित सुरू करावी अन्यथा शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर २३ मे पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली .
आमच्या प्रतिनिधीनशी सविस्तरपणे बोलताना गौतम कांबळे म्हणाले की ,सन २०१९ ते २०२१ दोन वर्षे कोविड१९ , बदली संगणक प्रणाली विकसित न झाल्याने व शाळा सुरू झाल्यानंतर बदली प्रक्रिया राबविण्यात येणार या व अनेक कारणांमुळे प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली नाही.सन २०२१ – २०२२ या शैक्षणिक वर्षात ७ एप्रिल २०२१ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांसाठी स्वतंत्र ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने व त्यासाठी आवश्यक असणारी संगणक प्रणाली (ॲप ) विकसित करण्यात आली आहे.परंतु बदली प्रक्रिया १ मे पासून सुरू होणे अपेक्षित असताना आज अखेर ( दिनांक ८ मे पर्यंत ) सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे , दुर्गम क्षेत्र निश्चित करणे ,रीक्त जागा जाहीर करणे ह्या प्रक्रिया पूर्ण झालेल्या दिसत नाही .बदली हा सर्वांचा भावनिक आणि संवेदनशील विषय आहे. महाराष्ट्रातील लाखो शिक्षक बदली प्रक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत.लवकरात लवकर दोन वर्षे प्रलंबित असलेली बदली प्रक्रिया १५ दिवसांत सुरू करावी व आंतरजिल्हा , जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेची वाट पाहणाऱ्या शिक्षकांना दिलासा द्यावा अन्यथा २३ मे २०२२ रोजी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघामार्फत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे धरणे आंदोलन करण्यासंदर्भात हेच अंतिम पत्र समजण्यात यावे . स्वतंत्र पत्र देण्यात येणार नाही ‘ याची नोंद घ्यावी असे निवेदन मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री , ग्रामविकासमंत्री ,शालेय शिक्षण मंत्री ,अतिरिक्त सचिव शालेय शिक्षण विभाग ,अतिरिक्त सचिव ग्रामविकास विभाग व शिक्षण आयुक्त यांना देण्यात आले आहेत .