
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:मुखेड तालुक्यातील देगाव येथे अवैध देशी दारूच्या मालाची वाहतुक करणा-या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ४ हजार २०० रूपयाची देशी दारू व १० हजार रुपये किंमतीची दुचाकी मुक्रमाबाद पोलिसांनी जप्त केली आहे.
मंगळवार दि. ३ रोजी रात्री १०.३० वाजता देगाव येथील मंदिरा समोरून दुचाकीवरून संतोष उत्तम पारसे व बबन गोविंद पारसे रा. बावलगाव ता. औराद हे दोघे देशी दारूचे दोन बॉक्स घेऊन कर्नाटकात जात होते.तेंव्हा देगावचे उपसरपंच नागनाथ रेड्डी यांनी त्यांना थांबवले व आमच्या गावात तर देशीदारू विक्री बंद आहे मग तू येथून दारू का घेऊन जात आहेस? तुला दुसरीकडून रस्ता नाही का? असे विचारले असता दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. त्यामुळे रेड्डी यांनी मुक्रमाबाद पोलिसांना माहिती दिली. पोलिस आले आणि दुचाकी व देशी दारु असा एकूण १४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी मुक्रमाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकर करीत आहेत.