
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:बेलगाम स्वस्त धान्य दुकानांना नोटीसीची मात्रापुरवठा विभागाचे कोणतेही नियंत्रण न राहिल्यामुळे बेलगाम झालेल्या देगलूर तालुक्यातील १३६ स्वस्त धान्य दुकानदारांना सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानाला फलक लावणे, दुकान चालू – बंद वेळेचा फलक लावणे, योजनानिहाय धान्य दराचा फलक लावणे, साठा नोंदवही अद्यावत ठेवणे, शिधापत्रिकाधारकांना धान्य वाटप करणे व शासकीय दराप्रमाणे पैसे घेणे पावती देणे, जे धान्य शिधापत्रिकाधारकांना वितरण झाले त्यांचीच पावती काढणे, हेल्पलाईन नंबर फलक दर्शनी भागावर लावणे आदी नियमांचे पालन करण्याबाबत प्रारंभिक नोटीस बजावली असून कोणत्याही वेळी अचानकपणे केलेल्या तपासणीत त्रुटी आढळल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
शहरातील काही दुकानांची पाहणी केल्यानंतर बाहेरील बाजूस स्वस्त धान्य दुकानाचा नामफलक देखील नसल्याचे आढळले. त्यामुळे दुकानाच्या आत काय
काय चालते याचा अंदाज घेत सर्वानाच नोटिसा देण्यात आल्या. येणाऱ्या काही दिवसात नियमांना धाब्यावर बसविणाऱ्या दुकानावर जरी कारवाई झाली तरच या नोटीस बजावण्याची कृतीमागे काही उद्देश आहे की केवळ कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार हे स्पष्ट होईल.
शहरातील स्वस्त धान्य दुकानातून नियमितपणे उपलब्ध असणारे धान्य खरेदी करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांशी केलेली चर्चा आणि दुकानांची पाहणी यावरून स्वस्त धान्य दुकान म्हणजे कमिशन पेक्षा वरकमाई जास्त असल्याचे दिसत आहे. धान्य देताना पॉईंट ऑफ सेल या मशिनमधून निघणाऱ्या पावतीचे अवलोकन केले तर यावर किती धान्य दिले, त्याची रक्कम याचा कोणताही तपशील न उमटता केवळ कागद बाहेर येतो. ग्राहकांची फसवणूक करण्यासाठीच हे जाणीवपूर्वक केले जाते. गोरगरीब व अज्ञानी ग्राहकांना दरडावले जाते. त्यामुळे त्यांच्याकडून दिले तेवढे धान्य घेतले जाते. यातूनच धान्याची हेराफेरीकेली जाते. कोरोना काव्यमध्ये नरेंद्र मोदी सरकारने जवळपास दहा महिने मोफत धान्य पुरवठा केला होता. याकाळात तर स्वस्त धान्य दुकानदारांनी मोफत धान्य व कमी किंमतीतले धान्य असा घोळ घालत मोठा धान्य साठा बाजारपेठेत वळविला.दुकानाच्या नामफलकाबरोबरच योजनानिहाय ग्राहक किती, कोणत्या योजनेखाली ग्राहकांना उपलब्ध असलेले घान्य मिळणारे धान्य याचाही तपशील लावून ठेवलेला नसतो. स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध काही तक्रार केली तरी पुरवठा विभागाकडून कारवाई तर केली जाताच नाही उलट तक्रारकर्त्यालाच फिरविले जाते. नव्यानेच रूजू झालेल्या सौम्या शर्मा सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी स्वस्त धान्य दुकानावर वारंवार तपासणी करून योग्य नियंत्रण प्रस्थापित केले तर शासकीय धान्याची काळ्या बाजारात केली जाणारी विल्हेवाट थांबून गोरगरिबांची पिळवणूक थांबेल अशी अपेक्षा यानिमित्ताने अनेक शिधापत्रिकाधारकांनी व्यक्त केली.