
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा : दि.६.छत्रपती शिवाजी महाराज. तीन अजर अमर अक्षर शब्द. ज्यांचं गारुड या महाराष्ट्रावर आभाळासारखं पसरलं आहे. जगातील हा एकमेव राजा आहे ज्याचं गुणगान आजही इथली प्रजा करत आहे. कारण त्यानं केवळ इथल्या भूमिवर नाही तर इथल्या लोकांच्या मनामनावर राज्य केलं. प्रेमानं, काळजीनं. हा राजा कैसा? ऐसा राजा न देखिला न ऐकिला कधी. हा राजा कैसा? ज्याच्या पुढे इतिहासही नतमस्तक झाला. हा राजा कैसा? अलम दुनियेत ज्यासी कोणी जोड नाही. हा राजा कैसा? नीति, शास्त्र, चारित्र्य, धैर्य, शौर्य, साहस, चातुर्य, दूरदृष्टी यांचा मूर्तिमंत आविष्कार. हा राजा कैसा? ज्याचं नाव घेताच मनात अभिमान दाटून येतो, मान गर्वाने ताठ होते. हा राजा कैसा .? . केवळ छत्रपति शिवाजी महाराजांसारखाच. हा एका युगाचा नायक. ‘युगनायक शिवराय’. गेली चारशे वर्षं महाराजांच्या सावलीखाली महाराष्ट्र वाढतो आहे.
६ जून शिवराज्याभिषेकाची तारीख. मला आठवत नाही की आपण इतर कोणत्याही राजाच्या राज्याभिषेकाची आठवणही ठेवतो म्हणून. मग त्याचा सोहळा साजरा करण्याची गोष्टच वेगळी. आपण आता लोकशाहीत जगतोय. तरीही एका राजेशाहीची आठवण जपून ठेवतोय. कारण या राजाने लोकांसाठीच आपलं आयुष्य खर्ची घातलं. हा रयतेचा राजा होता. ज्याने रयतेच्या कल्याणासाठीच स्वतःचा देह झिजवला. हा एकमेव माणूस असेल ज्याला लोकांनी राजा होण्यासाठी आग्रह धरला. ज्याची स्वतःची सिंहासनावर आरूढ होण्याची कधीच महत्त्वाकांक्षा नव्हती. लोकांनीच त्याला राजा होण्यासाठी आग्रह धरला. हे असं कधी घडत नाही. पण आपण इतके करंटे आहोत की या महान माणसालाही आपण त्याचं राजेपण, त्याची महानता विसरून त्याला त्याला त्याची जात विचारली. त्याला राजा होण्याचा अधिकार नाही असं सांगितलं. त्याला क्षुद्र ठरवलं. जातीचं विष आपल्या मनांत किती भिनलं आहे आणि त्यानं शिवाजी महाराजांनाही कसं पिळलं हे पाहिलं की निव्वळ संताप होतो.
काही तुच्छ मनोवृत्तीच्या माणसांनी त्यांच्या तथाकथित जातीय श्रेष्ठत्वाच्या आधारावर महाराजांना कमी लेखलं हे पाहिलं की त्या माणसाला किती त्रास झाला असेल याचा विचार करून मन भरून येतं. आपलं राजेपन क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना पुरावे द्यावे लागले हा विचारच मनात क्षोभ उत्पन्न करतो. मग त्या राजाला काय वाटलं असेल याची कल्पनाही करवत नाही. पण मला आनंद आहे की आज राजे असते तर त्यांना आनंद झाला असता की आपण त्यांना विसरलो नाही. अजुनही त्यांची आठवण काढतो. त्यांच्या राज्याभिषेकाचीही आठवण जपून ठेवतो. फक्त हे करतांना एक आठवण करून द्यावीशी वाटते की महाराजांनी ज्या आदर्शांची जपणूक केली, जी मूल्ये आयुष्यभर जपली त्यांचीही आठवण आपण ठेवावी. त्यांचा जयजयकार करतांना आपल्या हातून असं काही होऊ नये की ज्यामुळे त्यांच्या नावाला कमीपणा येईल. त्याची काळजी घेऊनच या जाणत्या राजाची आठवण आपण कायम आपल्या जगण्यात जीवंत ठेवूयात.