
दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
शेगांव (बुलडाणा); दि.६. आषाढी एकादशी पर्वावर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज (सोमवार) सकाळी शेगावातून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली.श्रींच्या पालखी वारीचे हे ५३ वे वर्ष आहे. वारीचा एकूण ७५० कि.मी.चा पायदळ प्रवास असून, यात ७०० वारकरी सहभागी आहेत. बुलडाणा, अकोला, वाशिम, परभणी, उस्मानाबाद, बीड, जालना, सोलापूर, या आठ जिल्ह्यांतून एकूण ५९ दिवसांचा प्रवास आहे.
सोमवारी सकाळी श्रींच्या रजत मुखवट्याचे विधीवत पूजन झाल्यानंतर मंदिराच्या प्रांगणात फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये श्रींचा मुखवटा विराजमान करून पालखी सोहळ्याला आरंभ झाला. भगव्या पताका खांद्यावर घेतलेल्या श्वेतवस्त्रधारी ७०० वारक-यांच्या शिस्तबद्ध रांगा, श्रीहरी विठ्ठल जयहरी विठ्ठल, गण गण गणात बोते या नामघोषाने व टाळ मृदंगाच्या निनादात मंदिर परिसरात चैतन्यासह भक्तीचा मळाच फुलला होता. श्रीं चे दर्शन घेऊन पालखीला निरोप देण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने शेगावात दाखल झाले होते.
८ जुलै रोजी श्रींची पालखी पंढरपुरला पोहचेल
अकोला, पातूर, रिसोड, परभणी, उस्मानाबाद, तुळजापूर, सोलापूर मार्गे ८ जुलै रोजी श्रींची पालखी पंढरपुरला पोहचेल तेथे पाच दिवसांच्या मुक्कामादरम्यान विठूरायाचे दर्शन घेऊन पालखी १३ जुलै रोजी परतीच्या प्रवासाला निघेल. कुर्डूवाडी, बार्शी, भूम, बीड, जालना, मेहकर, खामगांव मार्गे ३ऑगस्ट रोजी श्रींची पालखी शेगावी पोहोचेल.