
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधि – जब्बार मुलाणी
===================
शहरात बाधित डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. जुलै महिन्यात दहा दिवसांमध्ये डेंग्यूचे 164 संशयित, तर 11 बाधित रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे महापालिका वैद्यकीय विभागाकडून नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जून महिन्यात डेंग्यूचे 297 संशयित तर, 17 बाधित रुग्ण आढळले होते.
तर, जुलै महिन्यात 1 ते 10 जुलै, अशा दहा दिवसांतच डेंग्यूचे 11 बाधित रुग्ण आढळले. हिवतापाचे 2 बाधित रुग्ण जून महिन्यात आढळले होते. जुलै महिन्यात 1 ते 10 तारखेदरम्यान एकही रुग्ण आढळलेला नाही. चिकनगुनियाची साथ नियंत्रणात आहे. चिकनगुनियाचे जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत 13 संशयित रुग्ण आढळले आहेत.
मात्र, एकही बाधित रुग्ण आढळलेला नाही. पावसाळ्याच्या कालावधीत डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण असते. डासांमुळे हिवताप, डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे आजार पसरतात. हिवताप हा आजार पसरविण्यास अनॉफिलस डास तर, डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे आजार पसरविण्यास एडिस इजिप्ताय हे डास कारणीभूत ठरतात.
हिवताप, डेंग्यू किंवा चिकुनगुनिया झालेल्या व्यक्तीस डास चावला तर रोग्याच्या रक्तातील हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियाचे विषाणु त्या डासाच्या शरीरात शिरतात. असा विषाणुजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या रोगाचा प्रसार थांबवायचा असल्यास एनॉफिलस व एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालावा लागेल. एनॉफिलस अस्वच्छ व एडिस डासाची मादी घरात साठलेल्या स्वच्छ पाण्यावर अंडी घालते. त्यातून 2 दिवसांनी डास बाहेर पडतात. याचाच अर्थ डासांच्या उत्पत्तीसाठी साठलेल्या पाण्याची आवश्यकता असते.
डेंग्यूची लक्षणे: तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायूदुखी व सांधेदुखी, उलट्या होणे, डोळ्यांच्या आतील बाजूस दुखणे, अंगावर पुरळ, अशक्तपणा, भूक मंदावणे, तोंडाला कोरड पडणे, त्वचेखाली, नाकातून रक्तस्त्राव होणे व रक्ताची उलटी होणे, रक्तमिश्रीत / काळसर रंगाची शौचास होणे, पोट दुखणे, रक्तदाब कमी होणे, हातपाय थंड पडणे आदी.
चिकुनगुनियाची लक्षणे: कमी मुदतीचा तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, तीव्र सांधेदुखी, अंगावर पुरळ आढळून येणे आदी. वरील सर्व लक्षणे 7 ते 10 दिवसांसाठी असतात.
हिवतापाची लक्षणे: थंडी वाजून ताप येणे. ताप हा सततचा असू शकतो किंवा एक दिवसाआड येऊ शकतो. नंतर घाम येऊन अंग गार पडते. डोके दुखते. बऱ्याच वेळा उलट्या होतात.
महापालिकेकडून दक्षता घेण्याचे आवाहन पाणी साठविण्याच्या सर्व भांड्यातील पाणी वापरुन रिकामी करुन घासून/ पुसून कोरडी करावी. त्यानंतर त्यात पुन्हा पाणी भरावे. घरातील ज्या मोठ्या पाण्याच्या टाक्या रिकाम्या करता येणार नाहीत त्यांना घट्ट झाकण बसवावे. घरातील फ्लॉवरपॉट, कुलर, फ्रिजखालील ट्रेमधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावे.
घराच्या मागच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी. घराभोवती पाण्याची डबकी असतील तर ती बुजविणे किंवा संबंधित ठिकाणी पाणी वाहते केले जाईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.