
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सांगली : संकेत महादेव सरगरने 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे खाते उघडले आहे. त्याने वेटलिफ्टिंगच्या 55 किलो वजनी गटात 248 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले.
सुवर्णपदकापासून तो एक किलो दूर राहिला. मलेशियाच्या मोहम्मद अनिदने 249 किलो वजनासह सुवर्णपदक जिंकले. संकेतने स्नॅचच्या पहिल्याच प्रयत्नात 107 किलो वजन उचलले. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 111 किलो आणि तिसऱ्या प्रयत्नात 113 किलो वजन उचलले.
क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात संकेतने 135 किलो वजन उचलले आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी होऊ शकला नाही. यादरम्यान त्याला दुखापतही झाली. तो पदक घेण्यासाठी आला तेव्हा त्याच्या हातात पट्टी बांधलेली होती.
पण या 21 वर्षीय युवा खेळाडूने पदक जिंकून इतिहास रचला. संकेत महादेवला इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. सांगलीत राहणाऱ्या संकेतचे वडील भजी आणि चहा विकण्याचे दुकान आहे. त्याची धाकटी बहीण, 17 वर्षीय काजल हिने या वर्षी जूनमध्ये झालेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये 113 किलो वजनासह सुवर्णपदक जिंकले आहे.