
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:देगलूर व बिलोली तालुक्यातील महसूल यंत्रणेने’ अतिवृष्टीमुळे येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची जी माहिती आपल्याला दिली ती आपण स्वतः केलेली पाहणी तसेच आपल्या सहकाऱ्यांनी पाहणी करून दिलेला अहवाल पाहता अचूक व स्पष्ट असल्याचे दिसत आहे. आढावा बैठकीमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी त्रुटी असल्याच्या सूचना केल्या त्या अधिकाऱ्यांनी टिपून घेतल्या आहेत. यातून सर्वाना मदत निश्चित मिळेल असा विश्वास खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला.
देगलूर व बिलोली तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीबाबत येथील तहसील कार्यालयात शनिवारी आढावा बैठक झाली. या बैठकीस सहाय्यक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा, बिलोली उपजिल्हाधिकारी सचिन गिरी, तहसीलदार राजाभाऊ कदम, बिलोलीचे तहसीलदार निळे, नायब तहसीलदार बालाजी मिठेवाड, गटविकास अधिकारी शेखर देशमुख, कृषी अधिकारी गिरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नाईक, गिरी, प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे अभियंता निला, महावितरणचे कार्यकारी अभियंता चटलावार,
पाटबंधारे विभागाचे उपअभियंता करखेलीकर, जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे अभियंता राऊत, जिल्हा परिषद उपअभियंता घोडके, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विठ्ठलकुमार नागमवाड, जलसंधारण विभागाचे सरोळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर इरलोड, प्रभारी गटशिक्षणाधिकारी राजकुमार जाधवर, भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी आ. सुभाष साबणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रामदास पाटील सुमठाणकर, श्रावण भिलवंडे, जिल्हा सरचिटणीस गंगाधर जोशी, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पाटील बेम्बरेकर, शिवराज पाटील माळेगावकर, तालुका अध्यक्ष शिवाजी कनकंटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत पाटील राजूरकर, उपसभापती अॅड. रवी पाटील, नंदु पाटील पळणीटकर, पंकज देशमुख, शहराध्यक्ष अशोक गंदपवार, अनिल पाटील खानापूरकर, अशोक साखरे, गंगाधरदाऊलवार, रमेश पाटील हाळीकर उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश मंडळामध्ये मागील
काळात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती, शेतीचे झालेले नुकसान याची आपण प्रत्यक्ष फक्त काही भागात पाहणी केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान, माजी राष्ट्रपतींसाठी निरोप समारंभ, नवनिर्वाचित राष्ट्रपतींचे स्वागत या कारणांनी आपण जिल्ह्यातील सर्व भागात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी करू शकलो नाही. आमच्या काही सहकाऱ्यांनी देखील आपल्या भागातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून अहवाल दिलेला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत देण्यासंबंधीची भावना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली आहे. ज्या भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना दिलासा देण्याचा
निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा निश्चितपणे मिळणार असल्याचे चिखलीकर यांनी सांगितले. पावसाळ्याच्या दिवसात ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रकार होत आहेत. नवे ट्रान्सफॉर्मर महावितरण कंपनीला उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न राहील. जिल्ह्यात नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती झाल्यानंतर जेंव्हा जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक होईल, त्यात महावितरण कंपनीला मदत करण्याची आमची भूमिका असेल. परंतु पालकमंत्री नियुक्त होण्यापूर्वी अगोदर काही मदत देता येऊ शकते काय याबाबत आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणार असल्याचे खा. चिखलीकर म्हणाले.
जिल्हा परिषदेच्या किती जागा लढविणार या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष असून नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच्या सर्व जागा लढवून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविणार असल्याचे चिखलीकर यांनी सांगितले. किती जागा लढविणार, उमेदवार मिळतील काय हा प्रश्न अन्य पक्षांना विचारावा अशी कोपरखळी – त्यांनी मारली.