
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- माधव गोटमवाड
**************************
परभणी/पूर्णा : मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनची सर्व पिके करपून गेली आहेत. पिकांचे नुकसान आणि आर्थिक भुर्दंड यामुळे तालुक्यातील समस्त शेतकरी वर्ग कमालीचा हतबल झाला आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश देऊन पूर्णा तालुक्यात सुका दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातले केली जात आहे.
पूर्णा तालुक्यातील मौजे भाटेगाव येथील शेतकरी वर्गाने करपलेली पिकं दाखवत आपली व्यथा निर्देशीत केली आहे. पेरण्या करतांना लागणारे बियाणे, खतं, औषधी व शेतमजूरीसाठीचे पैसे कोणी कर्ज काढून तर कोणी सावकारांकडून अल्लाच्या सव्वा व्याजाने उपलब्ध केले होते. ज्यांच्याकडे दागिने आहेत अशांनी कोणी गहाण ठेवले तर कोणी बेभाव विकून पैसा उभा केला. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगायचे झाल्यास दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने कोणी कोणी तर जमीनी गहाण ठेवून किंवा विकून काढलेले पैसे वापरले. वेळेवर सर्व उभारले गेले तरच पिकं व्यवस्थित येऊ शकतील ज्यामुळे प्रारंभी व्याजाने काढलेला किंवा जमीन जुमला विक्रीतून लावलेला पैसा भरघोस पिकातून उभा राहिला जाईल अशी अशाच नव्हे तर खात्री होती. परंतु सुरुवातीला अगदी मनाजोगी दिसणारी पिके कालांतराने पावसाअभावी त्यातली गेली. सुमारे महिनाभर पावसाने दडी मारल्यामुळे हवामान उष्ण बनले गेले. परिणामी जमीन सुकी होऊन तिला मोठमोठ्या भेगा पडू लागल्या. पर्यायाने हिरवीगार दिसणारी पिके करपून गेली. हाता-तोंडाशी आलेला घास वरुण राजाच्या अवकृपेने जळून जात आहे. त्यामुळे समस्त शेतकरी कमालीचा हतबल झाला आहे. अडी-अडचणीतून उभा केलेला पैसाही गेला अन् पिकेही गेली. आमचे संसार उघड्यावर पडले असून प्रशासनाने वेळीच जागे होणे गरजेचे आहे. असा आक्रोश करीत पूर्णा तालुक्यातील शेतकरी वर्ग करपलेली पिकं दाखवत आपल्या व्यथा मांडत आहे.
पावसाअभावी पिकांची झालेली दशा परिणामी शेतकऱ्यांची अभागी दिशा लक्षात घेऊन तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना आमच्या करपलेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करुन तालुक्यात सुका दुष्काळ जाहीर करावा अशी त्यांनी प्रशासनाला पर्यायाने शासनाला आर्त हाक दिली आहे.
ज्या काही समस्या उद्भवल्या आहेत, त्या सर्वश्रुत आहेत. प्रत्येक वेळी आपल्या दालनातच येवून किंवा आणून दाखवल्या तरच त्या खऱ्या आहेत असा त्यांचा अर्थ होत नाही. परंतु शासनाचे कार्यतत्पर प्रतिनिधी म्हणून कर्तव्यावरील या. तहसीलदार व या. जिल्हाधिकारी यांनाही या साऱ्या समस्या पूर्णपणे अवगत आहेत तर मग यापेक्षा अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचा अनंत न पहाता तत्परतेने कार्यवाहीचे निर्देश द्यावेत, अशी कळकळीची विनंतीही शेतकरी वर्ग करीत आहे. वेळीच काळजीने कार्यवाही आणि आर्थिक मदतीसाठीची हलचल न केल्यास मात्र शेतकऱ्यांचा कधीही उद्रेक होऊ शकतो. संताप अनावर होऊन शकतो परिणामी जाणीवपूर्वक कार्यवाहीस टाळाटाळ करणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेस शाप का वरदान यापैकी काय योग्य ठरु शकेल यांचाही विचार त्यांना करावाच लागणार आहे एवढे नक्की.