
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर:खरीप हंगामातील मूग धान्याच्या खरेदीचा प्रारंभ गुरुवारी (ता. ८) देगलूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात करण्यात आला. या वेळी एफएक्यू मुगाला प्रतिक्विंटल नऊ हजार ११ रुपये भाव मिळाला. पहिल्याच दिवशी मोंढा बाजारपेठेत १७० क्विंटल मुगाची आवक आली होती. मुलाला प्रति क्विंटल सरासरी सात हजार ६५६ रुपये दर मिळाला.
या वर्षांच्या खरीप हंगामातील मुगाला दहा हजारांवर भाव मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. अतिवृष्टीत बहुतांश खरीप हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांजवळ फक्त वर्षभर पुरेल एवढी डाळ यातून मिळेल, अशी अपेक्षा आहे. देगलूर मोंढा बाजार समितीच्या प्रांगणात गुरुवारी दुपारी बारा वाजता मुहूर्ताचा श्रीगणेशा अशोक वद्येवार यांच्या अडतीसमोर करण्यात आला. या वेळी एफएक्यू मुगाला प्रतिक्विंटल नऊ हजार १९ रुपये भाव मिळाला. पहिल्याच दिवशी मोंढा बाजारपेठेत १७० क्विंटल मुगाची आवक आली होती. मुगाला प्रति क्विंटल सरासरी सात हजार ६५६ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. या वेळी व्यापारी, शेतकयांसह अडत व्यापारीअसोसिएशनचे अध्यक्ष श्रीनिवास मैलागीरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष मधुकर नारलावार, गंगाधर पाटील मुंडकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अशोक सुंदाळे, कर्मचारी विजय कल्याणी, संजीव रेड्डी या वेळी उपस्थित होते.
मोंढा बाजारपेठेच्या बाहेर बसलेल्या व्यापाऱ्यांकडून धान्याच्या खरेदी-विक्रीत शेतकऱ्यांची लुबाडणूक होणार नाही यासाठी बाजार समितीने इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे व इतर साहित्याची तपासणी करून त्यांच्यावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. अनेक मोंढ्यातील व्यापारीच अडत चुकविण्यासाठी बाहेर व्यापाऱ्यांना बसवीत असल्याचीही चर्चा होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने याकडे गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी पुढे येत आहे.