
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरात मनपा नियमांनुसार ओळखपत्र न बाळगता अवैधरित्या धंदा केल्यास कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड इशाराच परभणी महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी दिला आहे. आगामी एक ऑक्टोबरपासून महापालिका क्षेत्रात सर्वत्र ही कारवाई जोमाने
राबविली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
आयुक्तांनी फेरीवाल्यांना ओळखपत्र देऊन अधिकृत केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करणे क्रमप्राप्तच आहे तथापि याचाच गैरफायदा घेऊन अन्य कांहीं नियमांचे उल्लंघन होणार नाही याचेही कठोर निर्बंध राबवणे महापालिकेला आवश्यक ठरणार आहे. त्यात प्रामुख्याने
वाहतुकीला अडथळा ठरणार नाही आणि पायी रहदारी करणाऱ्या नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता फेरीवाल्यांनी घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महापालेकेने घालून दिलेल्या नियमांच्या चाकोरीत राहूनच असा धंदा करणे गरजेचे ठरले पाहिजे. ओळखपत्र प्राप्त झाले म्हणून कुठेही आणि कसाही धंदा केल्यास वाहतुकीचा खोळंबा तर होऊ शकतोच शिवाय पायी रहदारी करणाऱ्या पादचाऱी नागरिकांना कोणताही त्रास होता कामा नये. त्याशिवाय धंदा करतांना शहराचे व नागरिकांचे आरोग्य आणि सौंदर्य बिघडले जाईल असे कोणतेही कृत्य होणार नाही याची सुध्दा फेरीवायांनी काळजी घेणे आवश्यक राहिली गेली पाहिजे.
केळीची सालटं आणि भाजीपाला किंवा अन्य वस्तू विकतांना त्याचा कापलेला भाग व कचरा रस्त्यावर किंवा इतरत्र फेकून शहराचे सौंदर्य व आरोग्य बिघडले जाऊ नये यासाठी प्रत्येक फेरीवाल्याने तो कचरा एखाद्या टोपलीत, ड्रममध्ये किंवा गोणीमध्ये जमा करुन संध्याकाळी सोबत घेऊन जाणे आवश्यक राहील. तसे न करता तो लपून छपून कुठेही टाकल्यास वा फेकून दिल्यास दंडात्मक अशा कठोर कारवाईस समोर जावे लागेल असेही आयुक्तांनी आपल्या आदेशात नमूद करणे गरजेचे असणार आहे. तसे सूचित न केल्यास वितरित ओळख पत्रांचा गैरफायदाही घेतला जाऊ शकेल यात तिळमात्र शंका नसावी.
दीनदयाळ अंत्योदय योजने अंतर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान व शहरी बेघर निवारा या घटकांतर्गत महापालिकेने “राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता” या सेवा पंधरवाड्यानिमित्त मनपा क्षेत्रांतर्गतच्या सुमारे ३ हजार ७३१ फेरीवाल्यांना ओळखपत्र वितरित केली आहेत शिवाय आठ बेघर व्यक्तींना राशन कार्डही दिली आहेत. हा उपक्रम गुरुवारी राबवण्यात आला असून त्यावेळी आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्यासह अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त मनोज गग्गड यांचीही उपस्थिती प्रामुख्याने होती.
ज्या फेरीवाल्यांनी ओळख पत्र अद्याप नेली नाहीत, त्यांनी आपली नावे नोंदवून ओळखपत्र घेऊन जावीत अन्यथा ऑक्टोबरच्या एक तारखेपासून अवैधरित्या फेरीचा धंदा केला म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड इशारा आयुक्त सांडभोर यांनी दिला आहे. त्यामुळे उर्वरित फेरीवाल्यांमध्ये खळबळ माजली जाणे स्वाभाविक आहे एवढे नक्की.