
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
औरंगाबाद मतदारसंघातून शिंदे गटाच्या मदतीने २०२४ ची लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्याच्या पहिल्या मोर्चे बांधणीसाठी केंद्रीय कामगार, रोजगारमंत्री भूपेंद्र यादव ३० सप्टेंबर, १ ऑक्टोबर रोजी औरंगाबादसह इतर मतदारसंघांत बैठका घेत आहेत. दुसरीकडे १९८९पासून शिवसेनेचे प्रभुत्व असलेल्या औरंगाबाद लोकसभेत लढण्यासाठी शिंदेसेना फार हट्टी किंवा आग्रही नसल्याचे दिसत आहे.
शिंदेसेनेकडे प्रभावी जिल्हास्तरीय उमेदवार नसल्याचा अंतर्गत सूर असल्यानेही भाजपच्या मिशन ४५ला म्हणजे महाराष्ट्रातील ४५ जागा जिंकण्याच्या मोहीमेला सहकार्य करण्याची शिंदेसेनेची भूमिका समोर येत आहे. तसे संकेत गुरुवारी (२९ सप्टेंबर) पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी दिले. शिंदेसेना औरंगाबादमध्ये लढणारच असे ठाम वक्तव्य त्यांच्याकडून अपेक्षित असताना ‘याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेतील,’असे ते म्हणाले. मात्र, उद्धवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, भाजपच्या दंडबैठकांनी काहीही फरक पडणार नाही. हा आमचाच बालेकिल्ला आहे. त्यात गद्दार लढणार नाहीतच.
यादव शुक्रवार, शनिवारी लोकसभेसाठी आढावा घेतील. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड हेच पहिल्या पसंतीचे उमेदवार असतील, असे म्हटले जाते. त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला अशीही चर्चा आहे. याबाबत भुमरे म्हणाले की, प्रत्येक पक्ष निवडणुकीची तयारी करत असतो. औरंगाबादचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मुख्यमंत्री घेतील. मात्र, औरंगाबादचा खासदार शिंदेसेना-भाजप युतीचाच असेल.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे हेच आमचे शिवसेनाप्रमुख असे वक्तव्य केले. त्याविषयी भुमरे म्हणाले की, शिंदे हेच आमचे प्रमुख आहेत. शिवसेनेचे प्रमुख आहेत, असे आम्ही पहिल्यापासून सांगत आहोत.