
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मोखाडा – मोखाडा तालुक्यातील पोशेरा येथील पशुपालकांच्या गोठ्यांमध्ये प्रवेश करत स्वतः अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी तालुका पशुवैद्यकीय कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून गायी व बैलांना लंम्पी या आजाराचे लसीकरण करून घेतले असल्याची माहिती दिनांक 29 सप्टेंबर वार गुरुवार रोजी मिळत आहे.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांच्या या कृतीने ग्रामस्थांना आनंद झाला असुन त्यांनी रविंद्र शिंदे यांचे आभार मानले आहेत.
गाय व बैलं हा शेतकऱ्यांचा आत्मा असून त्यांचे लंम्पी आजारापासून संरक्षण करणे हे आपले प्रथमिक कर्तव्य असून त्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.म्हणून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये शंभर टक्के गाय व बैलांना लसीकरण करण्याच्या सूचना अतिरिक्त सीईओ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.याबाबत हलगर्जीपणा झाल्यास कोणतीही सबब वा कारण ऐकून घेतल्या जाणार नाही असे स्पष्ट निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत.आता पर्यंत तालुक्यातील किती जनावरांना लसीकरण झाले आहे याचा विस्तृत आढावा रवींद्र शिंदे यांनी यावेळी घेतला.
यावेळी मो-हांडा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी माता कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिकची मेहनत घेण्याच्या सूचना देत यासाठी जनजागृती कडे विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित तालुका आरोग्य अधिकारी,डॉक्टर,नर्सेस व तेथील कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
यावेळी माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहीम,कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया,नियमित लसीकरण, आरोग्य इमारतीचे बांधकाम, तालुक्यातील आरोग्य विभागातील मंजूर पदे,कार्यरत पदे व रिक्त पदे यांचा आढावा घेतला.
या ठिकाणी अधिकारी व कर्मचा-यांना संबोधित करताना रवींद्र शिंदे म्हणाले की, मर्कटवाडी सारख्या घटना टाळण्यासाठी उपकेंद्रात सुखरूप प्रसुती करणे आवश्यक असुन डॉक्टर,नर्सेस व कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.दर्जेदार सुविधा देण्याबाबत मी नक्कीच आग्रही राहीन असे ते म्हणाले आहेत.ज्यामुळे माता मृत्यू व बालमृत्यूचा दर कमी होण्यास नक्कीच मदत होईल.उपकेंद्रात डॉक्टर,नर्सेस व कर्मचारी यांच्या नियमित उपस्थितीकडेही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.कर्मचाऱ्यांच्या सर्विस बुक अद्यावत करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
तदनंतर त्यांनी पंचायत समिती मोखाडा येथे पोहोचत पंचायत समितीच्या विविध विभागांचा आढावा घेतला. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या अभियानाचा देखील त्यांनी विस्तृत आढावा घेतला.यानंतर पंचायत समिती हॉल येथे राष्ट्रीय पोषण आहार अंतर्गत स्वस्थ बालक बालिका तालुकास्तरीय स्पर्धा कार्यक्रमाला उपस्थिती दाखविली.यावेळी त्यांनी अंगणवाडी सेविका व मातांना मार्गदर्शन केले.तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी व मदतनीसांनी अधिक ची व विशेष मेहनत घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.पुढे मार्गदर्शनात रवींद्र शिंदे म्हणाले की योग्य वयात लग्न केल्याचे अनेक फायदे असून लग्नासाठी मुलाचे वय किमान 21 व मुलीचे वय किमान 18 झाल्या नंतरच लग्न करावे.यामुळेही कुपोषणाचा दर कमी होण्यास मदत होईल.शिक्षण हा खरा दागिणा असुन आदिवासी बांधवांना उच्चशिक्षित होण्यासाठी रविंद्र शिंदे यांनी यावेळी आवाहन केले आहे.
कुपोषण कमी होण्यासाठी दोन मुलांच्या पाळण्यामध्ये किमान चार ते पाच वर्षाचे अंतर ठेवण्याचे आवाहन यावेळी रविंद्र शिंदे यांनी केले.माता सुदृढ तर बाल सुदृढ होईल.म्हणून मातांनी अगोदर स्वत: सुदृढ बना असे आवाहन करत स्वच्छते बाबत जनजागृती केली.यावेळी सुदृढ बालक बालिका स्पर्धेतील विजेत्या बालकांना व मातांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे,जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंजाबराव चव्हाण गटविकास अधिकारी प्रकाश भोसले यांच्या पारितोषिक व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.गटविकास अधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वस्थ बालक बालिका स्पर्धेचे सुंदर आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पांढरे, सीडीपीओ कुलदीप जाधव,गटशिक्षणाधिकारी अमोल जंगले,तालुका आरोग्य अधिकारी डॉ भाऊसाहेब चत्तर, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भालचिम,पर्यवेक्षिका सुवर्णा पाटील आदि उपस्थित होते.
यावेळी शिक्षण विभागाचा देखील आढावा घेतला. मोखाडा प्रतिनिधी, सौरभ कामडी