
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””'””””””””””
परभणी : दुपारी दोनच्या सुमारास वीजांचा कडकडाट व कमालीच्या मेघ गर्जनासह सुरु झालेल्या या पावसाने परभणी शहरासह संपूर्ण तालुका अक्षरशः झोडपून काढला त्यामुळे शहरातील सखल भागांमध्ये व ग्रामीण परिसरातील अनेकांच्या शेतीमध्ये महापूर आल्याचे भयानक चित्र दिसून येत होते.
शुक्रवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी दोन वाजता वीजांचा कडकडाट व मेघ गर्जना सह सुरु झालेला मुसळधार पाऊस सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरुच होता. त्यामुळे ओढे व नाल्यांना नदीचे रुप दिसून आले. पावसाचे व नंदी नाल्यांचे वाहणारे ते. पाणी शेतकऱ्यांच्या शेतीत घुसून मोठ्या प्रमाणात हातात तोंडाशी आलेल्या पिकांचे कमालीचे नुकसान झाले आहे. त्यात कापूस, सोयाबीन या पिकांचे भरपूर नुकसान झाले आहे.
यापूर्वी संततधार पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे अगोदरच मेटाकुटीला आलेला शेतकरी पुन्हा एकदा आजच्या मुसळधार पावसामुळे पूरता झोडपला गेला आहे. शेती पिकांचे आजच्या पावसाने झालेल्या नुकसानीचा शासनाने त्वरीत सर्व्हे करुन घ्यावा व मदतीचे औदार्य दाखवावे असे निर्देश जिल्हा व तालुका प्रशासनाला तात्काळ द्यावेत अशी मागणीही पुढे येणे स्वाभाविक आहे.