
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी-दत्तात्रय वामनराव कराळे
कधी रोहित्र नादुरुस्त तर कधी जळलेले, पाणी उपसा करणाऱ्या चार पंपापैकी एक वर्षभरापासून नादुरुस्त तर एक पंप गायब, चालू असलेला पंप अनियमित व कमी दाबाने पुरवठा परिणामी लाखो लोकांना पाणी टंचाईच्या झळा !
परभणी : हजारो कोटींची लागत लावून परभणीकरांसाठी आणलेली पिण्याच्या पाण्याची योजना केवळ आणि केवळ महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे, ढिसाळ
आणि गलथान कारभारामुळे पूरती निष्प्रभ ठरली जात आहे. कधी रोहित्र ना दुरुस्त तर कधी जळलेले, पाणी उपसा करणाऱ्या एकूण चार पंपांपैकी एक पंप नादुरुस्त तर एक चक्क गायब करण्यात आले आहे, तर जे एक कार्यरत आहे ते सुद्धा अनियमित, कमी दाबाचा पाणी पुरवठा करणारे आहे. त्याचाच परिपाक म्हणून मागील अनेक दिवसांपासून परभणी शहरातील लाखो लोकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. असं असलं तरी प्रशासकीय यंत्रणा मात्र ढिसाळ कारभाराचे दररोज काही ना काही इरसाल नमूने प्रदर्शित करीत असल
यांचे आढळून येत असते. निरनिराळ्या करापोटी मोठं मोठ्या रकमा करुनही करदात्यांना नियमित व भरपूर दाबाने पिण्याचे पाणी पुरवठा करण्यात ही ढिसाळ यंत्रणा कुचकामी ठरत असेल तर आणि त्यांच्या त्या गलथानपणावर वरिष्ठ यंत्रणाही पांघरुण घालत असेल तर यापेक्षा दुर्दैव ते कोणते म्हणायचे, हा खरा सवाल आहे. नागरिकांना अनेक दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसूनही आयुक्तांना त्यासाठीची कोणतीही गंभीरता दिसत नसल्याचा संताप नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे. रोहित्र जळाल्यामुळे ते दुरुस्त करण्यासाठी युध्दपातळीवर काम केले जाणे क्रमप्राप्त असतांनाच त्याला बगल देत निव्वळ वेळकाढूपणा केला जात असल्याची टीका नागरिक करीत आहेत. एका बाजूला पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेचा गलथानपणा परिणामी नागरिकांना असह्य अशा झळा सासणे भाग पडत आहे.
एकूणच महानगर पालिकेच्या कार्यप्रणालीमध्ये प्रशासकीय यंत्रणा कमालीचा ढिसाळपणा करीत असल्याचे बोलले जात आहे. आंधळं दळतंय नि कुत्रं पीठ खातंय अशी दैन्यावस्था दिवसेंदिवस अधिकच वाढीस लागत असल्याचे दिसून येत आहे. अत्यावश्यक गरजेचे अशा पाणी पुरवठ्यासाठी लागणारी मशिनरी, साहित्य, किंवा जे जे आवश्यक अशा सामग्रीची नियमित काळजी घेणे, त्यासाठी सतर्कता बाळगणे, काळजीपूर्वक देखभाल करणे, सदैव कठोर सुरक्षा ठेवणे, मेन्टेनन्स व्यवस्था कायम ठेवणे यासाठी विशेष यंत्रणा तत्पर ठेवणे गरजेचे असूनही ते अंमलात न आणता या कामी पूर्णपणे गलथानपणाच असल्याचे वरील प्रमाणे नमूद सर्व घटनांवरुन पावलोपावली आढळून येत असते. अत्यावश्यक सेवा देणे वा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्यच आहे परंतु परभणी महापालिका मात्र त्यासाठी अपवाद असल्याचे प्रशासनाच्या गलथानपणातून स्पष्ट होत असल्याची टीका होतेय. या सर्व प्रकरणांमुळे ज्या पध्दतीचा वचक राहिला जाणे आवश्यक आहे, तसा वचक आयुक्तांचा प्रशासनावर नसल्याचे बोलले जात आहे. अत्यावश्यक सेवा नि मुलभूत गरजा भागविण्यासाठी महापालिकेने शहराचे पालकत्व म्हणून सदैव अग्रेसर व तत्पर राहिले पाहिजे अशी प्रत्येकाची भावना, धारणा असते स्वाभाविकच आहे परंतु तशी कोणतीही काळजी येथे घेतली जात नसावी. राज्याच्या पाणी पुरवठा मंत्रालयाने आणि औरंगाबाद विभागीय आयुक्तांनी यात वेळीच लक्ष न घातल्यास नागरिकांच्या संतापाचा उद्रेक कधीही होऊ शकेल याचीही शक्यता नाकारता येणार नाही अन्यथा “पाणी से रंगी आग” म्हणून कथित उद्रेकामुळे उघड्या डोळ्यांनी होणारे नुकसान बघत बसावे लागेल असं म्हटलं तर चुकीचं ठरु नये.