
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
खामगाव/प्रतिनिधी:-विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अधिकपणे भर पडून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उदात्त हेतूने पिंपळगाव राजा येथील जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे इंग्रजी विषयाचे कार्यतत्पर शिक्षक शेखर खोमणे यांनी शिक्षकी पेशा अधिकपणे भक्कम करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने स्वतंत्र पुस्तक संग्रहालयाची निर्मिती करून विद्यार्थ्यांसाठी मोफत पुस्तक संग्रहालय खुले केले आहे. त्यामुळे शिक्षक शेखर खोमणे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तालुक्यातील पिंपळगाव राजा येथील जि प हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत असलेले शिक्षक शेखर खोमणे यांनी विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेत भर पडावी व आपले विद्यार्थी घडावे, याकरिता स्वतःच्या घरी स्वतंत्र पुस्तक संग्रहालय तयार करून त्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाचनाकरिता पुस्तके ठेवली असून स्पर्धा परीक्षेची असंख्य पुस्तके यामध्ये दिसतात, त्याचबरोबर २८ डिक्शनरी, इंग्रजी संदर्भ ग्रंथ, शेक्सपिअरच्या नाटकांची संपुर्ण सिरीज (३७ नाटकांच्या पुस्तकांचा संच), कथा कांदबऱ्या
व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी याकरिता आवश्यक असलेली पुस्तके ठेवली आहेत, यामध्ये हजारो पुस्तकांचा समावेश आहे. यामुळे एकंदरीतच अनेक विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून अनेक विद्यार्थी घडले आहेत. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण सेवा मोफत उपलब्ध व्हावी या उद्देशाने शिक्षक शेखर खोमणे प्रयत्न करतांना दिसून येतात. ज्या ठिकाणी आपण शिक्षण सेवेचे कार्य करत आहे. त्याठिकाणी विद्यार्थी घडावे, ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे, त्या ठिकाणचे विद्यार्थी घडावे, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सोनेरी दिवस यावे, व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या त्रिसूत्री कार्यक्रमात शिक्षण शेखर खोमणे रमले आहेत. या शिक्षकाचे कार्य गेल्या ११ वर्षांपासून निरंतर सुरू असून शिक्षक खोमणे यांची भूमिका ही कौतुकास्पद असल्याची जाणीव विद्यार्थ्यांनी पुस्तक संग्रहालयात बोलतांना करून दिली. पिंपळगाव राजा या ग्रामीण भागातील विद्यार्थी व खामगाव ग्रामीण परिसरातून हजारो विद्यार्थी या पुस्तक संग्रहालयाला भेटी देत असून अनेक विद्यार्थी हे निरंतर दररोज याठिकाणी दाखल होतात. जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचे विद्यार्थ्यांविषयी असलेले आपुलकीच नातं यामधून खूप काही सांगून जाते.त्यामुळे शिक्षक शेखर खोमणे यांच्या कार्याची दखल इंग्लंडचे लंडन येथील डॉ.जेसन अँडरसन यांनी घेतली असून त्यांनी शिक्षक खोमणे यांच्या पुस्तक संग्रहालयाला भेट देऊन खोमणे यांच्या कार्याची प्रशंसा केली आहे. मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातुन हा उपक्रम राबविणारे एकमेव शिक्षक शेखर खोमणे यांच्याकडे पाहिले जाते.यामुळे शिक्षक शेखर खोमणे यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असल्याची भावना इंग्लंडचे लंडन मधील डॉ.जेसन अँडरसन यांनी व्यक्त केली.याचबरोबर शिक्षक शेखर खोमणे यांना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व शिवकालीन नाण्यांचा छंद, पोस्टाची तिकिटे व पक्षांच्या घरट्यांचा छंद आहे, त्याची निरंतर काळजी घेत विद्यार्थ्यांच्या अभ्यासमालेत यांची माहिती ते विद्यार्थ्यांना देतात. त्यामुळे शिक्षक शेखर खोमणे यांच्या कार्याचा इतिहास खूप वेगळा आहे.
संग्रहालयाची माहिती….
या संग्रहालयात शिक्षक शेखर खोमणे यांनी ३२ डिक्शनरी, मोगल, शिवकालीन, व ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची तसेच इतर विदेशी नाणी आहेत. पोस्टाची जवळपास ६०० विदेशी व २०० भारतीय तिकिटे आहेत.वेगवेगळ्या जातीच्या ५० पक्षांची पंख या ध्येयवेड्या शिक्षकाने याठिकाणी ठेवले आहेत.असंख्य जुन्या माचीस उपलब्ध केल्या आहेत. त्याचबरोबर पुस्तक संग्रहालयाच्या आवारात पक्षांसाठी घरटे बांधले असून त्यांच्या खाद्याची निरंतर सेवा तसेच पाहणी शेखर खोमणे करतांना दिसून येतात, चिमणी-बुलबुल सह हळद्या नावाच्या पक्षाचे वास्तव्य या घरट्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
“गेल्या ११ वर्षांपासून हे कार्य मी निरंतर सुरू ठेवल्याने व विद्यार्थ्यांकरिता हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्याने हजारो विद्यार्थी माझ्या पुस्तक संग्रहालयात येत असून अनेक विद्यार्थी वाचनातून घडल्याने मला समाधान मिळाले आहे. याचबरोबर पशुपक्षी-जूने देशविदेशी नाणे व पोस्टाची तिकिटे त्याचबरोबर पक्षांची पंख या पुस्तक संग्रहालयात उपलब्ध केली आहेत. विद्यार्थ्यांचा वाढता कल माझ्या कार्याची दखल आहे.
– शेखर खोमणे
(शिक्षक, जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव राजा)