
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी –
सरपंचपदी कल्पेश राऊत तर उपसरपंचपदी सुलोचना चौधरी यांची निवड
जव्हार:-तालुक्यात १६ ऑक्टोंबरला पार पडलेल्या ४६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकिंमुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते.जव्हार तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या कासटवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेने आपल्या शिवनेरी पॅनलचे थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत कल्पेश विनायक राऊत यांना निवडून आणले होते परंतु २७ ऑक्टोंबरला झालेल्या उपसरपंच पदाच्या निवडी पर्यंत राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. शिवनेरी पॅनलने ८/६ अशा फरकाने विरोधकांना पराभवाचा धक्का देत सुलोचना विलास चौधरी ह्या उपसरपंच पदी विराजमान होताच शिवसेना ठाकरे गटाने पुन्हा एकदा कासटवाडी ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व असल्याचे दाखवून दिले.
प्रथमच थेट सरपंच पदाच्या झालेल्या निवडणुकीत शिवनेरी पॅनलने बाजी मारून मतदारांनी कल्पेश राऊत यांच्या बाजूने कौल देत ग्रामपंचायतीवर विजय पताका फडकवली होती परंतु उपसरपंच पदी नक्की कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच शिवनेरी पॅनलने राजकीय डावपेच टाकत विरोधकांना पराभव स्वीकारण्यास भाग पाडले.सरपंच आणि उपसरपंच एकाच पॅनलचे असल्याने पुन्हा एकदा कासटवाडी ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपले वर्चस्व असल्याचे सिद्ध केले.