
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
मागील ४ वर्षात १५०० डोसचा झाला वापर
जव्हार:-पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आणि अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या जव्हार तालुक्यात कुटुंबाच्या नियोजनाच्या दृष्टीने पाळणा लांबविणे गरजेचे असताना जव्हारच्या पतंगशहा उपजिल्हा रुग्णालयात मागील चार वर्षात एक हजार पाचशे डोस अंतरा इंजेक्शनच्या माध्यमातून महिलांना मोफत दिल्याने पाळणा लांबविण्यासाठी फलदायी ठरले आहे.विशेष म्हणजे ग्रामीण अतिदुर्गम भाग असताना देखील शिक्षणाच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागाच्या समुपदेशाने अंतरामुळे तालुक्यातील महिलांचे आरोग्य देखील चांगले राहत आहे.
कुटुंबात पती अगर पत्नीला शस्त्रक्रिया न करता नको असलेल्या गर्भधारणेसाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे अंतरा हे इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे.एकदा इंजेक्शन घेतल्यानंतर तीन महिने गर्भधारणेची चिंता महिलांना राहणार नाही.लग्नानंतर पहिले अपत्य उशिरा हवे असल्यास किंवा दोन अपत्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी बऱ्याचदा महागड्या औषधांचा वापर केला जातो.मात्र आता नको असलेल्या गर्भधारणेपासून सुटका मिळविण्यासाठी सोपा व सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे.महिलांना कुटुंब नियोजन करणे अधिक सोपे करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्शन उपलब्ध केले आहे.याचा लाभ तालुक्यातील महिला मोठ्या प्रमाणात घेत आहेत.हे इंजेक्शन जव्हार तालुक्यातील प्रथम पतंगशहा उपजिल्हा रुग्णालय आणि मोखाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे मोफत उपलब्ध असून मातांनी तसेच महिलांनी या सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.
अंतरा इंजेक्शन चे लाभ
हे इंजेक्शन एकदा घेतल्यास तीन महिन्यांपर्यंत गर्भ राहणार नाही. अंतरा या इंजेक्शनमुळे महिलांचा रक्तक्षयापासून बचाव होतो.
अंतरा इंजेक्शन बंद केल्यानंतर गर्भधारणा होण्यास सात ते दहा महिन्यांचा कालावधी
अंतरा इंजेक्शनमुळे बीजांडाच्या कर्करोगापासून बचाव होतो. तसेच लैंगिक संबंधावर,प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही.
२०२२ या वर्षातील नऊ महिन्यांत जव्हार तालुक्यातील पतंगशहा उपजिल्हा रुग्णालय जव्हार येथे अंतरा इंजेक्शन लावून पाळणा लांबविणाऱ्या महिलांची संख्या ४११ इतकी आहे.दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे.
पाळणा लांबवण्यासाठी इंजेक्शन अंतरा हे हार्मोनल इंजेक्शन दर तीन महिन्याने दिले जाते.
बाळ ३-६ महिन्याचे झाल्यावर लगेच गर्भधारणा होऊ शकते. अशा वेळेस दर 3 महिन्यांनी इंजेक्शन घेणे रोज गोळ्या घेण्यापेक्षा जास्त सोयीस्कर आहे.हे इंजेक्शन घेण्याआधी स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तसेच परिणाम व दुष्परिणामांची सखोल माहीती घ्यावी.
डॉ.भरतकुमार महाले,स्त्री रोग तज्ञ तथा वैधकिय अधीक्षक,ग्रामीण रुग्णालय मोखाडा