
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईपर्यंत एक मुद्दा सातत्यानं चर्चेत राहिला, तो म्हणजे शिंदेंचं बंड मुख्यमंत्री पदासाठी असल्याचा. या मुद्द्यावर शिंदे गटाकडून वेळोवेळी खुलासेही करण्यात आले. मात्र, बच्चू कडू यांनी मुख्यमंत्रीपदाचा उल्लेख करत शिवसेनेवर दावा ठोकण्याबद्दल केलेल्या विधानानं हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. मुख्यमंत्रीपदापर्यंत लढाई ठीक होती, असं आमदार कडू म्हणालेत. त्याचा अर्थ शिंदेंचं बंड मुख्यमंत्रीपदासाठी होतं, असा प्रश्न उपस्थित झालाय.
यापूर्वीही एकनाथ शिंदे, शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि रामदास कदम यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल विधान केलेली आहेत. उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करणार होते, पण ऐनवेळी स्वतः झाले. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनीही उपमुख्यमंत्री पद आणि मुख्यमंत्री पदाबद्दलची मनातील खदखद व्यक्त केलेली आहे. त्यामुळे आता बच्चू कडूंच्या विधानावर शिंदे गटाकडून काय भूमिका मांडली जाणार हे पाहावं लागेल.