
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मारहाण करणाऱ्या अंबरनाथमधील प्रवीण गोसावी या तरुणाला पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. गोसावीला तब्बल दोन वर्षांची तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.
त्यामुळे प्रवीण गोसावीच्या अडचणीत भर पडली आहे. या नोटीसीनंतर सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण गोसावीने दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे ८ डिसेंबर २०१८ रोजी अंबरनाथ शहरात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी प्रवीण गोसावी याने कार्यक्रम झाल्यानंतर आठवले यांना पुष्पगुच्छ देण्याच्या निमित्ताने जवळ जात त्यांच्या कानशिलात लगावली होती. यानंतर जमावाने गोसावी याला बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी प्रवीण गोसावी याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल अडीच महिने कारागृहात राहिल्यानंतर गोसावी याची सुटका झाली होती.
प्रवीण गोसावीला त्यानंतर आता पुन्हा १२ ऑक्टोबर २०२२ रोजी अंबरनाथच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे. गोसावी याच्यावर आठवलेंना मारहाण करण्यासह दाखल असलेले एकूण दोन गुन्हे, दोन चॅप्टर केस आणि एक एनसी याच्या आधारे ही नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसीमध्ये गोसावी याला ठाणे, बृहन्मुंबई , मुंबई उपनगर आणि रायगड या चार जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे.
सदर नोटीसला आपण कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असल्याची भूमिका प्रवीण गोसावी यांनी घेतली आहे. तसंच हा सामाजिक कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असून माझ्यावर असलेल्या केसेस या सामाजिक कामामुळेच असल्याचंही गोसावी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या सगळ्याबाबत अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांनी सदर प्ररकरणावर कॅमेरासमोर काहीही बोलण्यास नकार दिला. सध्या तडीपरीची प्रक्रिया सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला माहिती दिली जाईल, असं सातव यांनी स्पष्ट केलं.