
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील बाह्यवळण रद्द न झाल्याने येथील शेतकरी व रियालाइनमेंट विरोध शेतकरी कृती समितीच्या वतीने ३१ जणांनी सोमवारपासून (ता.७) उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्याने आंदोलक आक्रमक झाले आहेत.आंदोलन सुरू होऊन पाच दिवस उलटले तरी अद्याप प्रशासन आणि नॅशनल हायवे यांना तोडगा काढता आला नाही . त्यामुळे उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची प्रकृती अजूनच खालावत चाललेली आहे, त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन आता जीव गेला तरी चालेल परंतु आम्ही जोपर्यंत नॅशनल हायवे यांच्याकडून ठोस निर्णय किंवा पत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्ते तात्यासाहेब वडापुरी यांनी व्यक्त केली.
आतापर्यंत प्रांताधिकारी, तहसीलदार,डी वाय एस पी, नॅशनल हायवे चे नारायणकर यांनी या आंदोलनास भेट देऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले, पंरतू त्यांना यश आले नाही आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत.
बाह्यवळणास रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी १५ ऑक्टोबर २०२१ रोजी १०८ दिवसाचे बेमुदत धरणे आंदोलन केले होते व ३० जानेवारी २२ ला आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मध्यस्थी केल्याने त्यावेळी आंदोलन मागे घेतले. मात्र, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आमचा लढा सुरूच ठेवणार असेही त्यावेळेस आंदोलकांनी सांगितले होते. मात्र आंदोलनकर्त्यांची दखल घेण्यात आली नाही.
उपोषणाबाबत उपोषणकर्ते सर्जेराव जाधव म्हणाले, की राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने येथील रियालिमेंटची (बाह्यवळण) तिसरी अधिसूचना काढली त्यावर आम्ही रीतसर हरकती नोंदवल्या. त्याची सुनावणी झाली. परंतु त्याचा विचार न करता पुन्हा भूमिअभिलेखतर्फे मोजणीच्या नोटिसा काढण्यात आल्या. त्यामुळे आता आमच्या मागणीसाठी उपोषणाला जण बसलो आहोत.यावेळी उपोषणकर्ते तात्यासाहेब वडापुरे म्हणाले, आमचा प्रश्न हा खासदार सुप्रिया सुळे यांनीच मिटवला पाहिजे व आमदार दत्तात्रेय भरणे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.दरम्यान, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली व तुमची मागणी वरिष्ठांकडे पाठवू, असे आश्वासन दिले.
खासदार सुप्रिया सुळे यांना २०१८ मध्ये निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांची इंचभर ही जमीन जाऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले. याचा आम्ही दोन वर्षे पाठपुरावा केला. त्यानंतर त्यांनी हा प्रश्न तुमच्या स्थानिक आमदार यांच्याकडे दिला असल्याचे सांगितले. मात्र आमदार दत्तात्रेय भरणे यांनी कोणाला दुखवायचे अशा भूमिकेत हात वर केल्याचा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत येथील बाह्यवळण रद्द होत नाही तोपर्यंत आमचे उपोषण सुरूच राहणार आहे अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.