
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्याचे भूषण, कीर्तन केशरी ह.भ.प. गुरुवर्य अच्युतराव महाराज यांचा झी टॉकीज या वाहिनीतर्फे काल सन्मान करण्यात आला आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते रविवार, दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजता झी मराठी वाहिनीतर्फे आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
“गजर भक्तीचा, सोहळा आनंदाचा” या झी वाहिनीवर हा सोहळा मोठ्या प्रमाणात आयोजिला होता. परभणी जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी ह.भ.प. अच्युतराव महाराजांच्या सुश्राव्य कीर्तनाचे सोहळे मोठ्या प्रमाणात गावोगावी आयोजित केले जात असतात. हजारो भाविक भक्तगणांचा जनसागर त्यांच्या या भक्तीमय कीर्तनात ओथंबून लोटला जातो. सुश्राव्य कीर्तनाचा लाभ मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते.
परभणी जिल्ह्याला भक्तीमय कीर्तनाचा मोठ्या प्रमाणात वारसा लाभला आहे. सुप्रसिद्ध कीर्तनकार म्हणून ख्याती मिळवलेले ह.भ.प. मोतीराम महाराजांचे आद्य शिष्य म्हणून प्रख्यात असलेले ह.भ.प. मारोतराव महाराजांचे ह.भ.प. अच्युतराव महाराज हे सुपुत्र आहेत. सुश्राव्य कीर्तनाचा हा सांस्कृतिक वारसा मागील अनेक वर्षांपासून परभणी व राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सातत्याने चालत आला आहे. ह.भ.प. अच्युतराव महाराजांना मिळालेला हा सन्मा्न्यजन पुरस्कार संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद असेच मानले जात आहे. त्यांच्या हजारो-लाखो भक्त गणांमध्ये या पुरस्कार प्राप्तीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.