
दैनिक चालू वार्ता परभणी उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
परभणी : शहरापासून काही अंतरावरील कमलापूर नामक गावात पतीनेच आपल्या पत्नीचा शिरच्छेद करुन सर्वत्र थरार उडवून दिला. एवढ्यावरच न थांबता त्याने एका हातात धारदार शस्त्र व दुसऱ्या हातात शिरच्छेद केलेलं ते मुंडकं घेऊन परिसरात खुलेआम भटकंती केली, ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली. अमानवीय कृत्याने बेभान झालेल्या निर्दयी पतीला कायद्याचीही तमा राहिली नव्हती. दरम्यान या साऱ्या भयावह घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये मात्र पूरती खळबळ माजली गेली.
पूर्णा तालुका व ताडकळस पोलीस ठाणे क्षेत्रातील हे कमलापूर. गाव तसं छोटं आणि लोकवस्ती सुध्दा बोटावर मोजण्याइतपत. परंतु घडलेल्या या अमानवीय प्रकरणाची सत्य वास्तविकता पुढे आली नसली तरी नक्कीच मनाला ठेच देणारी व काळीमा फासली जाणारी असू शकेल. त्याशिवाय कोणताही पती आपल्याच पत्नी विरोधात एवढे टोकाचे पाऊल उचलू शकणार नाही अशीही धूसर कुजबूज ऐकावयास मिळाली तर आश्चर्य वाटू नये.
मंगळवारी रात्री उशीरा घडलेली ही भयान घटना, गावखेडे असल्यामुळे लवकरच लोक झोपत असतात. काहीजण साखर झोपेतही असावेत. तथापि रात्रीच्या सुमसान अंधारात घटित खळबळजनक घटनेचा मोठमोठ्याने झालेला कर्कश आवाज कानी पडताच काहींची झोप मात्र पूर्णपणे कधी उडून गेली हे कळलंच नाही. सर्वत्र दबक्या आवाजात का होईना परंतु भितीदायक किलबिलाट सुरू झाला होता.
दरम्यान या घटनेची खबर मीळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे व.पो.नि. विजय राठोड व अन्य सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चुक काहीही असली तरी पत्नीचा एवढ्या अमानुषपणे शिरच्छेद करणाऱ्या पतीच्या मात्र राजेंद्र शिरतोडे नामक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी मुसक्या आवळण्याचे फर्मान अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना सोडले. धारदार शस्त्रासह आरोपीला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.
अशीच एक क्रुर घटना जिंतूर तालुक्यातील पांगरी येथे सुध्दा घडली गेली आहे. तेथे झालेल्या हाणामारीत एक महिला धारदार शस्त्राच्या गंभीर मारामुळे ठार झाली आहे. अन्य दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. एकूणच काय तर शहर असो वा ग्रामीण परिसर. कायदा व कायद्याचे रक्षक म्हणून ज्यांना संबोधले जाते त्या पोलिसांचा वा खाकी वर्दीचाही धाक कमी होत चालल्याचे मागील काही दिवसांपासूनच्या गंभीर घटनांवरुन दिसून येत आहे. अपूरे पोलीस बळ परिणामी लोप पावत जात असलेला खाकीचा वचक आणि कायद्याची भीती त्या तुलनेत वाढीस लागलेले गुन्हेगार आणि गुन्हेगारी पोलिसांची निंद हराम करणारी ठरली जात आहे.
ज्यामुळे शहर व ग्रामीण परिसरातील कायदा व सुव्यवस्था पूरती धाब्यावर बसविण्याचे कुटील काम अशा प्रवृत्तींकडून केले जात आहे. कठोर कायदा व प्रबळ भीती निर्माण होईल अशा अंमलबजावणीची खरी गरज असल्याचे बोलले गेल्यास आश्चर्य वाटू नये.