
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर येथील उपजिल्हा कार्यालयांमध्ये अंगावर डिझेल टाकून आत्महत्याचा प्रयत्न देगलूर तालुक्यातील करडखेड येथील शासनाने भूसंपादन केलेल्या गावठाण जमिनीवर अतिक्रमण करून सदरील जमिनीची विक्री होत असल्याबाबत
गावातील एका युवकाने मागील दोन वर्षांपासून ही बाब निवेदनाद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. परंतु कारवाई होत नसल्याने युवकाने बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयात डिझेल अंगावर टाकून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. कार्यालयातील शिपायाने प्रसंगावधान राखत त्याच्या हातातील आगपेटी काढून घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
तालुक्यातील करडखेड येथील १.७५ हेक्टर आर जमीन शासनाने १९६६-६७ मध्ये गावठाण विस्तारवाढ योजनेसाठी संपादित केली होती. याजमिनीलगतच करडखेड येथील गणेश महाजन यांच्या मालकीची जमीन आहे. त्यांनी गावठाण जमिनीवर अतिक्रमण करीत त्या जमिनीवर प्लॉटिंग टाकून त्याची विक्री करत असल्याचा आरोप करीत अंकुश सूर्यवंशी यांनी याप्रकरणी दोन वर्षापासून तक्रारी केल्या. परंतु यावर प्रशासन कोणतीच कारवाई केली नाही. १९ नोव्हेंबर रोजी सूर्यवंशी यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
त्यानंतर बुधवारी युवकाने उपजिल्हाधिकारी कार्यालयात बाटलीतून आणलेले डिझेल अंगावर ओतून घेतले. आगपेटीची काडी ओढत असतानाच कार्यालयातील शिपाई संतोष दाऊबे यांनी प्रसंगावधान राखत त्याच्या हातातील आगपेटी काढून घेतली. त्यानंतर प्रशासनाने शासनाकडून संपादित करण्यात आलेल्या जमिनीची भूमिअभिलेख कडून मोजणी करून घेण्यासाठी करडखेडच्या ग्रामसेवकास पत्र देऊन पुढील कारवाईचे आदेश दिले आहे असे सांगण्यात आले आहे.