
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
_डॉ. निता पाटील फाऊंडेशन आणि पाषाणे ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित शिबिराला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद._
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला पाषाणे जिल्हा रायगड येथे ४ डिसेंम्बर रोजी रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. पाषाणे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री प्रवीण चौधरी आणि शिव उत्सव हौसिंग सोसायटी यांच्या पुढाकाराने हे शिबीर यशस्वी झाले.
या शिबिरामध्ये ३२ युनिट रक्त संकलन झाले. ग्रामीण भागात ३२ युनिट रक्त संकलन ही विशेष कौतुकाची बाब आहे असे मत फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. अमितकुमार गोईलकर आणि डॉ. निता पाटील यांनी मांडले. रक्तदानासाठी महिला रक्तदात्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला हे विशेष. नेत्र तपासणी साठी १६५ हुन अधिक नागरिकांनी लाभ घेतला. त्यांना मोफत चष्मा फ्रेम दिल्या तसेच या तपासणीमध्ये ६ लोकांचे मोतीबिंदू निदान झाले. त्या ६ नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया फाऊंडेशनच्या वतीने मोफत केली जाईल असे संस्थापकांनी सांगितले.
या शिबिरासाठी शिव उत्सव सोसायटीचे सर्व सभासद, तरुण कार्यकर्ते मोठया उत्साहाने कार्यरत होते.
उपसरपंच वर्षा चौधरी यांनी उपस्थित राहून शिबिराचा आढावा घेतला. रक्तदान शिबिरासाठी चिदानंद चॅरिटेबल ट्रस्ट ब्लड सेंटर डोंबिवली यांनी संकलन केले.
रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि डोनेशन कार्ड देण्यात आले.