
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
कृषी विभागाकडून होणारे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन यावेळी औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यात होणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन येत्या 1 जानेवारीपासून सिल्लोड तालुक्यात होणार आहे. या प्रदर्शनाच्या आयोजनासंदर्भातील सोमवारी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठक झाली.
आतापर्यंत उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात होणारा कृषी प्रदर्शनाचे आयोजन यावेळी मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, बियाणे तसेच शेतीपूरक व्यवसाय संबंधी मार्गदर्शन मिळावे यासाठी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर या प्रदर्शनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात कृषी क्षेत्रातील शास्त्रज्ञ व तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तर कृषी प्रदर्शन दिशा दर्शक ठरावा यासाठी अधिकारी-कर्मचारी व समनव्यक समितीच्या सदस्यांनी समनव्यातुन एक टीम म्हणून काम करावे असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
नेहमी दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या मराठवाड्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे याचा मोठा फायदा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. नेहमी पारंपारिक पिकांमध्ये अडकलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान आणि पिकांची माहिती यावेळी मिळणार आहे. सोबतच कृषी क्षेत्रातील अनुभवी लोकांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा कसा पाठींबा मिळतो हे देखील पाहणं महत्वाचे ठरणार आहे.