
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
डॉ. अच्युत बन यांच्या
एकसष्टी निमित्त लिहीलेला लेख ….
डॉ. दिलीप प़ुंडे,
पुंडे हॉस्पिटल, मुखेड जि.नांदेड
9422874826
डॉ अच्युत बन हा माझा 11 वी पासून ते MBBS – MD पर्यंतचा मूळातच कुशाग्र बुद्धीमत्तेचा मित्र. आम्हां दोघांचीही आर्थिक परिस्थिती सारखीच. अत्यंत गरीबीतूनचे शिक्षण. दोघांच्याही घरी भाकरीचीच लढाई होती. म्हणजे थोडक्यात पीठाची. आईवडीलांचे संस्कार आणि आम्हां लाभलेल्या गुरुंमुळेच आमचा प्रवास *पीठापासून विद्यापीठापर्यंत* झाला. अशा हलाखीच्या परिस्थितीतही त्याच्या वडिलांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून त्याच्या सर्व भावंडाना शिक्षण दिले. अच्युतही 10 वी 12 वी त बोर्डाच्या विशेष गुणवत्ता यादीत होता. औरंगाबादच्या संत तुकाराम हॉस्टेलचे आम्ही दोघेही विद्यार्थी. शासनाचे आमच्यावर अनंत उपकार. पुढे एम. डी. च्या काळात तो मार्डचा सेक्रेटरी होता. डॉ. एस. एच तालिब, डॉ. नंदकुमार उकडगावकर, कै. डॉ. र. भा. भागवत, डॉ पी. वाय मुळे, डॉ.पिसोळकर यांच्या सारखे निष्णात गुरू आम्हाला लाभले. असं म्हणतात की, गुरुंच्या आयुष्यात फक्त दोनच रंग असतात. पांढरा रंग म्हणजे खडू आणि काळा रंग म्हणजे ब्लॅकबोर्ड… पण या गुरूंनी दोन रंगाच्या सहाय्याने आमच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात रंगांची उधळण केली. असे निष्णात गुरू लाभले आणि त्यामुळेच लाखो रुग्णांची यशस्वी रुग्णसेवा आम्हाला करता आली आणि येत आहे. आईवडील, कुटुंबीय, गुरुजन,समाज आणि सर्व रुग्णांच्या बाबतीत आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.
‘उपक्रमशीलता’ हा मुळातच अच्युतचा स्थायीभाव. आमच्या GMCA 79 (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद 79) बॅचचे वैभव म्हणजे आमच्या अनेक मित्रमंडळीनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत अनेक यशोशिखरे पादाक्रांत केली आहेत. अच्युतच्या जीवनातील प्रत्येक घटनेचा मी साक्षीदार आहे. तो नांदेडला आला आणि त्यांनी तेथेच हॉस्पिटल सुरू केले. त्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले. एकाने मला विचारले की, तुम्ही काय घेऊन आलात ? त्याला उत्तर असे होते की – Two hemispheres of brain and stethoscope… तर अशीच सुरुवात अच्युतचीही. नंतर त्यांनी प्रसाद हॉस्पिटलची केलेली उभारणी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. धन्वंतरी रुग्णालय, एडस् रुग्णालय यांच्या उभारणीतही त्यांचं मोठं योगदान राहिलेलं आहे.
अनेक उत्तम गुणांपैकी त्याचा विशेष गुण म्हणजे त्याची अफाट स्मरणशक्ती… अर्धे अधिक जग पाहिलेला हा आमचा मित्र खरा आनंदयात्री आहे. त्याने जगभर फक्त प्रवासच केला नाही तर त्याचा लिखित स्वरूपातला विपुल ठेवा अमूल्य आहे व तो इतरांसाठी मार्गदर्शक आहे.. अच्युतचं आर्थिक नियोजनही वाखाणण्याजोगे आहे.
जोडुनिया धन उत्तम व्यवहारे
उदास विचारे व्यंच करी।।
अर्थाजन करणे, पैसे वाचवा, वाढवा, वापरा आणि वाटा या भावनेतून त्याची प्रसाद बन साहित्य पुरस्कार चळवळ आज महाराष्ट्रात अनोखी ठरली आहे. मृत्यूऩंतरही आईवडिलांना विचारांतून जीवंत ठेवण्याचा त्याचा हा प्रयत्न म्हणजे एक आगळेवेगळे पुण्यस्मरण होय. त्याची संगीत व साहित्याविषयीची आवड वाखाणण्याजोगी आहे. त्याच्या आवाजातला गोडवा आम्हाला भारावून टाकतो. एकसष्टी मध्येही त्याने स्वतःचे आरोग्य अबाधित ठेवले आहे. भूत तो सपना है,भविष्य कल्पना है लेकिन वर्तमान तो अपना है.वर्तमानात जगणे हाच सुंदर जगण्याचा मूलमंत्र होय.ह्याच तंत्रानुसार डॉ. अच्युत जगत असतो म्हणून तो सदैव हसतमुख असतो.
जगभर भटकंती, फार्म हाऊस व घराभोवतीची बाग यातून त्यांचं निसर्गप्रेमही दिसून येते. असं अच्युत बन हे बहुआयामी व्यक्तीमत्व आहे.
माणसाचा साठीनंतर जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. मला असे वाटते की, माणसाने जेष्ठ व्हावं म्हातारं नव्हे… कारण जेष्ठत्व हे शहाणपण, मार्गदर्शक तत्त्वे,तडजोड घेऊन येते. जेष्ठपण हे इतरांना सल्ला देते आणि म्हातारपण हे अश्रू, तक्रारी आणि गोळ्ंयाचा डब्बा घेऊन येते. जेष्ठत्व हे उद्याच्या सुर्योदयाची तर म्हातारपण हे मृत्यूची वाट पहात असते.. तर हा आमचा मित्र एकसष्टीतून जेष्ठत्वाकडे पदार्पण करीत आहे आणि ख-या अर्थाने तो समाजासाठी दीपस्तंभ ठरत आहे.
त्याच्या जगण्याला लांबी, रुंदी अन् खोलीही आहे. सतत आनंदी, क्रियाशील आणि उच्च ध्येय ठेवून तो जगतो. स्वतःचे आरोग्य, कौटुंबिक व सामाजिक आरोग्य तो सदैव जपत असतो, त्यामुळे अच्युतची एकसष्टीच नव्हे तर शतकोत्सवही साजरा होईल.
समाजातील विविध बाबींवर त्याच्या टिप्पणीही कौतुकास्पद असतात. सततचे लिखाण हा त्याचा ईकीगाईआहे. मानवी मेंदूच्या बाबतीत असं म्हणतात की Use it… Or loose it… हा आमचा मित्र सततची उपक्रमशीलता आणि त्यातून त्यांच्यात निर्माण होणारी ऊर्जा यामुळे तो जेष्ठच होत राहील व समाजासाठी तो आदर्श ठरेल यात शंका नाही. मित्रभाव जपणे हा त्याचा स्थायी गुण आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने तो आम्हां मित्रमंडळींना एकत्र करतो, लहान सहान गोष्टीतही तो आनंद शोधतो. देहाकडून देवाकडे जाताना आपण देशाचं काही देणे लागतो याचे तो सतत भान ठेवतो. नायगाव तालुक्यातील होटाळा हे त्याचं गाव, गावाबद्दलही त्याला स्वाभिमान व आपुलकी आहे. आजच्या डिजिटल युगात तो सदैव सक्रिय राहतो. अनेक जिवाभावाचे मित्र त्याने निर्माण केले. माणसाला इकीगाई (अर्थपूर्ण जगण्याचा उद्देश)
सापडला की, त्याच्या आयुष्याला – जीवनाला लांबी रुंदी आणि खोली आपोआपच प्राप्त होते.
समाजात डॉक्टरांप्रति नकारात्मक भावना हल्ली जाणवते तरीपण समाजात अनेक डॉक्टर चांगले काम करत आहेत आणि समाजाला सदैव चांगल्या डॉक्टरांची आवश्यकता असते. अश्याही परिस्थितीत आमचे मित्र म्हणजे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू व सध्याचे महाराष्ट्राचे आरोग्य शिक्षण संचालक डॉ दिलीप म्हैसेकर, सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ व्यंकटेश काब्दे सर, निष्णात आणि विख्यात ह्रदयरोगतज्ञ डॉ.अजित भागवत, डॉ. सुनील शिरसीकर, डॉ अनिल तोष्णीवाल, डॉ दीपक मांडाखळीकर, डॉ जनार्दन भुमे, सैन्य दलात सेवा देऊन पुन्हा खाजगी वैद्यकीय व्यवसायात आलेले आणि संगीत, नाट्य आदी क्षेत्रात नावाजलेले डॉ. अनंत कडेठाणकर. किनवट सारख्या अतिदुर्गम भागात निष्काम सेवा देणारे डॉ अशोक बेलखोडे, डॉ.उमेश भालेराव, डॉ. उमेश नावाडे,डॉ. सत्यवान मोरे, डॉ. अनिल दिवाण, डॉ. नवल मालू, डॉ. अरुण मान्नीकर, डॉ मुळमुळे, डॉ नितीन जोशी, डॉ. अनंत सूर्यवंशी, डॉ शिवाजी वाडेकर, डॉ. दि. भा. जोशी, अश्विनी परीवार, रमेश मेगदे व प्रसार माध्यमांतून सदैव सामाजिक न्याय देणारे श्री संजीवजी कुलकर्णी, श्री शंतनुजी डोईफोडे,श्री गोवर्धनजी बियाणी आदि मित्रांचे कार्य हे दीपस्तंभासारखे आहे.
मी सदैव म्हणत असतो…..
डॉक्टरांच्या गोळ्या खावून जगण्यापेक्षा मित्रांच्या टोळ्यात राहून जगा. एक चांगला मित्र म्हणजे एक कॅपसूल आणि मित्रमंडळ म्हणजे आख्खं मेडीकलचे दुकान.
दवा में कोई खुशी नही और खुशी जैसी दवा नही
असे मित्र म्हणजे मी माझी श्रीमंती समजतो. आता आम्ही सर्व मित्र जेष्ठ होत आहोत.
थोडा पढा गॉंव छोडा,
जादा पढा शहर छोडा
और जादा पढा देश छोडा…
असे पूर्वीचे तत्त्व होते. पण 1988 साली *खेड्याकडे चला* (विथ मिशन ) या ध्येयाने मी मुखेड सारख्या ग्रामीण भागात स्थिरावलो आणि माझी अनेक मित्रमंडळी नांदेडला आणि इतर शहरांत. ..
आरोग्य, साथीदार, संतती, संपत्ती आणि प्रतिष्ठा* ही यशस्वी जीवनाची पाच सुखे मानली जातात. विधाता प्रत्येकाच्या पदरात ही सर्व सुखे टाकतोच असे नाही पण या बाबतीत डॉ अच्युत बन भाग्यवान आहे. ही पाचही सुखे त्याला भरभरून लाभली आहेत भांवडांनाही स्थिर करण्यात त्याचे मोठे योगदान आहे. त्याच्या या प्रवासात सौ.वर्षा वहिनी आणि त्यांच्या दोन्ही पुत्र डॉ अमित आणि डॉ अनुज यांचंही योगदान वाखाणण्याजोगे आहे. कौटुंबिक जीवनातही अत्यंत यशस्वी असलेला आमचा हा मित्र.
डॉ. अच्युत बन यांना आयुष्याच्या या विशेष वळणावर मनस्वी शुभेच्छा.
आमच्या मैत्रीच्या ……
आठवणींचा ठेवा,आठवणीत ठेवा ।
आजच्या आठवणींना वाटो
कालच्या आठवणींचा हेवा ।।
जीवेत शरदः शतम्… 🌹