
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड तालुक्यातील पांढरवाडी, नागेली, तिरकसवाडी, शेम्बोली आदी गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. रिक्टरस्केलवर ३.० तीव्रतेच्या धक्क्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी संपर्क साधला असता, वेबसाईटवर भूकंपाचे धक्के दिसत आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती घेत असून घाबरण्याचे कारण नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचे भूकंप शास्त्र विभागाचे प्रमुख टी विजयकुमार यांनी वेबसाईटवर पडलेला भूकंप रिस्टरस्केल हा चुकीचा असून तो परभणीमध्ये केंद्रबिंदू असल्याचे सांगितले. वेबसाईटवर दुरुस्ती केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मुदखेड तालुक्यात पांढरवाडी, नागेली, शेम्बोली, तिरकसवाडी या गावात रात्री उशिरा सौम्य भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद झाली आहे. भूकंपाचे मुख्य केंद्र बिंदू पांढरवाडी असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातून समजले आहे. या भूकंपाची तीव्रता ३.० रिक्टरस्केल असतानाही नागरिकांना या
भूकंपाची फारशी जाणीव झालेली नाही. याविषयी माहिती
मिळताच परिसरातील नागरिकांत काहीशी घबराट निर्माण झाली आहे. तालुक्यातील विविध गावात भूकंपाचे सौम्य बसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने या घटनेची विशेष काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
अशाप्रकारचे भूकंपाचे धक्के वारंवार बसत असल्यामुळे भूगर्भात नेमके काय बदल होत आहेत, याचे संशोधन होणे गरजेचे असून निसर्गाचा समतोल बिघडण्यात या भागातील प्रचंड मोठ्या प्रमाणातील अवैध उत्खनन जबाबदार असल्याची चर्चाही होत आहे.