
दैनिक चालु वार्ता परभणी उपसंपादक -दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : शहरातील शिव महापुराण कथा श्रवण सोहळ्याला लाखो भाविक भक्तांचा जनसागर उसळला आहे. अलोट गर्दीने शहर ओसंडून वाहते आहे. न भुतो न भविष्याति अशी ही भक्तांची अलोट गर्दी ह.भ.प.सद्गुरू पंडितजी प्रदीप शर्मा यांचे अलौकिक शिव महापुरात श्रवण करण्यासाठी उपस्थित आहे.
हिंदूह्रदय सम्राट, शिवसेना प्रमुख स्व.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंडित प्रदीप शर्मा यांचे ‘शिव महापुराण कथा’ सोहळा परभणी जिल्हा शिवसेनेचे खासदार संजयजी जाधव यांनी आयोजित केला आहे. त्या कथेचं श्रवण करण्यासाठी हा जनसागर उसळलेला दिसून येत आहे. जर्मनी पध्दतीने उभारलेला अद्ययावत व सुसज्ज असा भव्य दिव्य सभामंडप खचाखच भरुन ही भक्तांची तां तां रिघ सभामंडपाच्या बाहेरही अगदी ओसंडून वाहताना दिसत होती. लाखोंच्या संख्येतील हा जनसागर भक्ती भावाने तल्लीन झालेला दिसत होता. केवळ परभणी जिल्हाच नव्हे तर लगतचे अन्य जिल्हे व राज्यभरातून अनेक ठिकाणांहून शिव महापुराण कथा ऐकण्यासाठी आलेले आहेत. डोळ्याचं पारणं फिटावं असा हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे मावळे आणि राजे संभाजी मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी तळमळीने सेवारुपी परिश्रम घेत आहेत. या भक्ती सोहळ्याचा देखावा बघून अनेकजण भारावून गेले आहेत. हजारोंच्या संख्येतील जत्थेच्या जत्थे सभामंडपात येताना दिसून आले. सभामंडपाचे १६५ × ७०० क्षेत्रफळाचा परिघ असूनही भक्तांना आसनस्थ होण्यासाठी जागा कपूरी पडल्याचे जाणवले गेले. पंडित प्रदीप शर्मा यांच्या मधूर वाणीतून सूश्राव्य शिव महापुराणाचे श्रवण करण्यासाठी हा भक्तांचा मेळा तेजोमय अशा भक्ती भावाने फुलल्याचे दिसत होते. शहरातील रेल्वे स्थानक व बस स्टॅण्ड परिसरापासून कार्यक्रम स्थळी भक्तांना येण्यासाठी व परत जाण्यासाठी सुध्दा मोफत सेवेची सोय करण्यात आली आहे. कथेची सुरुवात तशी दुपारनंतरची आहे परंतु जागा मिळेल का नाही या शक्यतेमुळे सकाळपासूनच भक्तांनी सभामंडप ओसंडून वाहायला लागले होते. नामांकित अशा पंडितजी प्रदीप शर्मा यांचे मधूर वाणीतले करणं मनमुराद श्रवण करता यावे म्हणून भक्तांचा हा जनसागर ओसंडून वाहायला लागला होता. आजपासून सुरू झालेला हा सोहळा आगामी १७ तारखेपर्यंत चालणार आहे. लाखोंच्या संख्येतील भाविक भक्तांच्या सुरक्षेसाठी हजारो सुरक्षा रक्षकांची व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिमतीला पोलीसही मोठ्या संख्येने सेवारत आहेत. सभामंडप व बाहेर सुद्धा सी.सी.टी.व्ही लावण्यात आले आहेत. भक्तांच्या सेवेसाठी अनेक प्रकारची दुकाने परिसरात थाटून उद्योजकांची ही उपजिविका साधली जाईल अशी पर्वणी कार्यरत ठेवली आहे. शहर व परिसरात सर्वत्र मोठमोठे होर्डिंग्ज व बॅनर्स लावून या भक्तीपूर्ण सोहळ्याची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात आली आहे. ॲटो रिक्षांवर ही मोफत सेवा असे बॅनर्स लावून हजारोंच्या संख्येतील ही वाहने भक्तांच्या सेवेसाठी कार्यान्वित आहेत. एकूणच परभणी शहर व परिसर भक्तीमय वातावरणात फुलून निघाले आहे.