दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : सध्या महाराष्ट्रात शहरांच्या नामांतरणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. उस्मानाबाद आणि औरंगाबाद या शहरांची नावे छत्रपती संभाजीनगर व धाराशीव केल्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी केली होती.
तसेच आता पुणे शहराचे नाव बदलून जिजाऊ नगर करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे. तसेच हा मुद्दा ते आगामी अधिवेनात उपस्थित करणार आहेत. त्यावर हिंदू महासंघाने आक्षेप नोंदविला आहे. पुणे शहराला राजमाता जिजाऊ यांचे नाव देणे उचित होणार नाही, अशी भूमिका हिंदू महासंघाने घेतली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज (दि.१४) ते पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी याबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणाचाही अनादर करणे योग्य नाही. पुणे शहर म्हणजे मिनी इंडिया आहे. त्यामुळे या प्रकरणावर सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. असे अजित पवार म्हणाले.
यावर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘सध्या राज्यात महागाई, बेरोजगारी असे प्रचंड प्रश्न आहेत, हे प्रश्न असताना नवीन नवीन प्रस्ताव पुढे येतात. त्यावर आमच्यासारख्या राजकीय नेत्याला बोलणे अवघड होते. कारण तो भावनिक विषय असतो. सध्या सगळ्या गोष्टी चांगल्या चालल्या आहेत. या प्रश्नावर चर्चा करून विश्वासात घेऊन निर्णय अपेक्षित आहे. पुणे हे आता कुणा एकाचे राहिलेले नाही. पुणे मिनी इंडिया आहे. मूळ पुणेकरांना काय वाटते याचाही विचार करावा लागेल. उगीचच बाहेरच्यांनी सल्ला द्यायला सुरुवात केली तर अडचणीचं ठरतं. कोणाचाही अनादर होणार नाही. सर्वांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी. सगळीच नावं चांगली आहेत. पुणे हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेले आहे. पिंपरी चिंचवडलाही पुण्याचाच भाग समजले जाते. महत्त्वाचे विषय बाजूला ठेवायचे आणि मूळ विषय भरकटवायचे असे सुरू आहे. माझी विनंती आहे की सर्वांनीच समंजस भूमिका घेतली पाहिजे.’ असे यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले.
अमोल मिटकरी यांनी पुणे शहराला जिजाऊनगर नाव देण्यात यावे अशी मागणी केली होती.
त्यासंबंधीचे ट्वीट देखील त्यांनी केले होते.
त्यावर हिंदू महासंघाने विरोध दर्शवत भूमिका मांडली होती की,
‘जिजाऊमाता देशातील सर्व हिंदुत्ववाद्यांना आणि शिवभक्तांना वंदणीय आहेत. मात्र पुणे शहराला त्यांचे नाव देणे उचित होणार नाही, असे आमचे मत आहे. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील या शहराचे नाव बदलले नव्हते. त्याऐवजी राजमाता जिजाऊ यांचे लाल महाल येथे स्मारक उभारण्यात यावे. हिंदू महासंघाची ही जुनीच मागणी आहे.’ असे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले. त्यानंतर उत्पन्न झालेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी सर्वांनी सामंज्यस्याची भूमिका घ्यावी. असे मत व्यक्त केले आहे.


