दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:-संतोष मनधरणे
देगलूर;, दि.16 – कोरोना निर्बंधांमुळे ब्रेक लागलेल्या राज्यस्तरीय कामगार कबड्डी स्पर्धेचा तब्बल 2 वर्षांच्या खंडानंतर यंदा थरार अनुभवायला मिळणार आहे. औद्योगिक व व्यावसायिक कामगारांची २६ वी आणि महिलांची २१ वी खुली राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा हुतात्मा बाबू गेनू मुबई गिरणी कामगार क्रीडा भवन, सेनापती बापट मार्ग, प्रभादेवी, मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे. २४ ते २७ जानेवारीदरम्यान ही स्पर्धा होत असून इच्छुक संघांकडून दि.२० जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मुबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक संघांनी अधिक माहितीसाठी www.public.mlwb.in या संकेतस्थळास अथवा नजीकच्या कामगार कल्याण केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी केले आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदित असलेल्या आस्थापनांच्या संघांना स्पर्धेत भाग घेता येणार आहे. महिलांसाठी ही स्पर्धा खुली आहे. दरवर्षी राज्यभरातून १०० पेक्षा अधिक कबड्डी संघ या स्पर्धेत सहभागी होतात. पुरुष शहरी, पुरुष ग्रामिण व महिला खुला अशा तीन गटांत साखळी सामने खेळवण्यात येतील. तीनही गटातील अंतिम विजेत्या संघांना प्रत्येकी रु.५० हजार, उपविजेत्या संघांना रु.३५ हजार आणि तीनही गटातील प्रत्येकी २ उपांत्य उपविजेत्या संघांना २० हजार तसेच सांघिक चषक, खेळाडूंना वैयक्तिक पदके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. या शिवाय, सर्वोत्कृष्ठ अष्टपैलू खेळाडू, सर्वोत्तम चढाई, सर्वोत्तम क्षेत्ररक्षण (पकड) आणि प्रत्येक दिवसाचा सर्वोत्तम खेळाडू आदी वैयक्तिक पारितोषिके खेळाडूंना दिली जातील. मुंबई व ठाण्याव्यतिरिक्त बाहेरुन येणाऱ्या सर्व संघांना प्रती दिन रु.४०००/- प्रवास व निवास भत्ता दिला जाणार आहे. मुंबई व ठाण्यातील महिला संघांना प्रती दिन रु.१०००/- भत्ता दिला जाणार आहे. मंडळाच्या महाकल्याण या युट्यब चॅनलवर तसेच soprtvot.com या क्रीडा संकेतस्थळावर या सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल.


